माय नगर वेब टीम
मुंबई - राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यामध्ये स्थापन होईल असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी सकाळी राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधातला आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकरापरिषद घेऊन स्पष्ट केलं आहे. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीमधून अजित पवार अचानक उठून निघून गेल्यानंतर काय काय झालं यासंदर्भातील माहिती आता समोर आली आहे.
रात्री साडेआठ वाजता
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांना संपर्क करुन सरकार बनवण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना संपर्क केला. शिवसेनेच्या नेत्यांबरोबर सुरु असणाऱ्या बैठकीमधून अजित पवार तडकाफडकी निघून आले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपाला पाठिंबा असल्याचे पत्र भाजपाच्या नेत्यांना दिल्याचे समजते. यासंदर्भातच शरद पवार यांनी दुपारी बारा वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, आमदारांच्या सह्या असलेल्या पाठिंब्याचं पत्र दाखवून राजपालांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
रात्री बारानंतर
भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसहीत राजभवनामध्ये पोहचले. भाजपाने अजित पवारांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर सत्ता स्थापनेचा दावा केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या सर्व घटनाक्रमाची माहिती लागू नये म्हणून लवकरात लवकर शपथविधी उरकून घेण्यासाठी फडणवीस आग्रही होते. मात्र राज्यपालांनी सकाळी शपथविधीचा वेळ दिला.
रात्री एक वाजता
राज्यपालांनी महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील एक ई-मेल राष्ट्रपतींना पाठवला. राष्ट्रपती भवनातून हा ई-मेल गह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. केंद्रीय मंत्रीमंडळ यावर निर्णय घ्यावा यासाठी हा ई-मेल गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. यासंदर्भात ‘भास्कर डॉट कॉम’ने संविधान तज्ज्ञ पीडीटी अचारी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी “राष्ट्रपतींकडे जेव्हा राज्यापाल राष्ट्रपती शासन हटवण्यासंदर्भातील शिफारस करतात तेव्हा यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी असणे गरचे असते. यावर केंद्रीय मंत्रीमंडळातील सर्व मंत्री आमच्या सहमतीची स्वाक्षरी करतात. हा प्रस्ताव नंतर राष्ट्रपतींना पाठवला जातो. त्यानंतरच राष्ट्रपती राजवट मागे घेता येते,” अशी माहिती दिली.
महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी रात्रीच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर करुन त्यावर मंत्र्यांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. हे मंजूरीपत्र राष्ट्रपतींना शनिवारी पहाटेच्या सुमार मिळाल्यानंतर पहाटेच्या सुमारास राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आल्याचे अध्यादेश राष्ट्पतींनी जारी केला.
शपथविधी नक्की कधी पार पडला?
त्यानंतर राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हा शपथविधी सोहळा नक्की कधी पार पडला याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. राष्ट्पतींनी सकाळी सव्वा पाच वाजता राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेतली. त्यानंतर लगेचच फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. एनएनआय या वृत्तसंस्थेने सकाळी आठच्या सुमारास ही बातमी प्रसिद्ध केली. पीटीआय या वृत्तसंस्थेनेही सकाळी साडेसातच्या सुमारास शपथविधी सोहळा पार पडल्याचे म्हटले आहे.
Post a Comment