गडकिल्यांच्या संवर्धनासाठी निधी द्या ;खा. नीलेश लंके यांचा केंद्रीय मंत्री शेखावत यांच्याकडे प्रस्ताव


 


स्वदेश दर्शन २.० व प्रसाद योजनेअंतर्गत विशेष निधीची मागणी 


माय नगर वेब टीम

अहिल्यानगर :    महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे शाश्वत संवर्धन, पर्यटन सुविधांचा विकास आणि वारसा सर्किट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष निधीची मागणी करत खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे. राज्यातील किल्ल्यांना राष्ट्रीय वारसा आणि पर्यटन दृष्टीने जागतिक स्तरावर नेण्याचा हा व्यापक प्रयत्न मानला जात आहे. 

     खा.लंके यांनी पाठवलेल्या प्रस्तावात नमूद केले की, महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले स्थापत्य, इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि साम्राज्यनिर्मितीच्या वैभवाचा  ठसा आजही जपून ठेवतात. मात्र अनेक किल्ल्यांवर जिर्ण प्रवेशमार्ग, पाणी-शौचालयांचा अभाव, माहिती फलक नसणे, मार्गदर्शकांची कमतरता, पर्यटन केंद्र नसल्याने संपूर्ण पर्यटन क्षमता वापरली जात नाही. 

     खा. लंके यांनी आपल्या प्रस्तावात नमूद केले की, त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आपला मावळा ही युवा संस्था विविध किल्ल्यांवर कचरा निर्मूलन, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, ऐतिहासिक जनजागृती, असे उपक्रम राबवत आहे. या स्वयंसेवी प्रयत्नांना शासकीय पाठिंबा व निधी मिळाल्यास संवर्धन अधिक प्रभावी होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

     पर्यटन मंत्रालयाने आव्हान आधारित गंतव्यस्थान विकास उपक्रमांतर्गत अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी २४.९९ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल खा. लंके यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याच धर्तीवर संपूर्ण राज्यासाठी एकात्मिक किल्ला सर्किट उभारण्याची त्यांनी मागणी केली आहे. 

प्रस्तावित महाराष्ट्र किल्ला वारसा सर्किट 

या प्रस्तावात खासदार लंके यांनी प्रस्तावित केलेले किल्ला सर्किट पुढीलप्रमाणे : शिवनेरी-पुणे; छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, धरमवीर गड-अहिल्यानगर; छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्यस्थळ, रायरेश्वर-पुणे; स्वराज्याची शपथ जिथे घेतली ती पवित्र भूमी, रामशेज-नाशिक; शिवकालीन सामरिक महत्व असलेला अजिंक्य किल्ला, तिकोणा-पुणे; अफझलखानवरील महत्वपूर्ण विजयाचे ऐतिहासिक स्थळ, प्रतापगड-सातारा; शिखर युध्दानंतरचे प्रमुख विश्रांतीस्थान, विश्रामगड-अहिल्यानगर; छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी केंद्र, भुदरगड-कोल्हापूर; मराठा साम्राज्याच्या सामरिक व्यवस्थेचा आधारस्तंभ. 


प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे  

किल्ल्यांवर पर्यटन पायाभूत सुविधा उभारणे, रस्ते, पाण्याची सोय, शौचालये, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग इ. डिजिटल माहिती केंद्र आणि ई-तिकीटिंग, ऐतिहासिक माहितीचा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रसार, स्वच्छता व पर्यावरणपूरक वाहतूक, नैसर्गिक वारसा जतन करण्यासाठी शाश्वत पर्यटन, स्थानिक तरूणांसाठी रोजगारनिर्मिती, मार्गदर्शक, तिकीटव्यवस्था, व्यवस्थापन या क्षेत्रात भर, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाला मान्यता, आपला मावळासारख्या संस्थांना थेट सहभागी करण्याचा प्रस्ताव.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post