शिक्षक हा समाज घडविणारा घटक - प्रा. माणिक विधाते




माय नगर वेब टीम
अहमदनगर - शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल अ.ए.सो. च्या रुपीबाई मोतीलाल बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या कुसूम मावची यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी मावची यांचा सत्कार केला. यावेळी उपप्राचार्य श्याम जोशी, पर्यवेक्षक तिलतिम्मा शिंदे, सोमनाथ नजान, अनिकेत आगरकर, राकेश सायके आदींसह शालेय शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात मावची यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शिक्षक हा समाज घडविणारा घटक आहे. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता शिक्षक आपल्या शिष्यांना ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करुन प्रेरणा देत असतात. मावची यांना मिळालेला पुरस्कार नगरकरांच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. शिक्षण क्षेत्रात अ.ए.सो. संस्थेचे मोठे योगदान असून, या पुरस्काराने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. सत्कारा उत्तर देताना कुसूम मावची यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रा. माणिक विधाते शहरातील सर्व शिक्षकांशी जोडले गेले आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने महिला दिन, शिक्षक दिन आदी विविध उपक्रम साजरे करीत असताना शिक्षकांचा सन्मान करुन भावी वाटचालीस प्रेरणा दिली जाते. प्रा. विधाते शिक्षक असल्याने राजकारणात देखील त्यांनी चांगली प्रतिमा निर्माण करुन एक आदर्श समाजापुढे ठेवला असत्याचे सांगून, सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मावची यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे अभिनंदन करीत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post