३७० कलमास पहिला विरोध डॉ. आंबेडकर यांचा होता – योगी आदित्यनाथ
माय नगर वेब टीम
नाशिक - ३७०ला सर्वप्रथम जर कोणी विरोध केला असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व तो कलम अमलात आणून कॉंग्रेस सरकारने जे पाप केले होते ते पाप धुण्याचे काम भाजपा सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
नवीन नाशिकमधील पवननगर येथील मैदानात भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आजपर्यंत राजकारण करत भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड तोडले. आज हे दोन्ही पक्ष परिवार पार्टी म्हणून बनून राहिले आहेत.
त्यामुळे पुन्हा ते सत्तेत येतील असे स्वप्न त्यांनी बघू नये. नाशिक नगरी ही धर्मपीठ, शक्तीपीठ, संग्रामनगर व श्रमिकनगरी आहे. कुंभमेळ्याच्या काळात नाशिकचा जो विकास झाला तो केवळ भाजपा सरकार सत्तेत असल्यामुळे अन्यथा कॉंग्रेस सत्तेत असती तर याठिकाणी भ्रष्टाचाराचे राजकारण झाले असते.
यावेळी त्यांनी मोदींच्या सर्व कामांचा आढावा या ठिकाणी प्रसिद्ध करत महिला सक्षमीकरणासाठी तीन तलाकचा प्रश्न मोदींनी सोडवल्याचे प्रकर्षाने सांगितले. तसेच ३७० कलम हा देशासाठी लागलेला कलंक धुवून काढण्यासाठी भाजपा सरकारने हा कलम हटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खर्या अर्थाने वंदन केले.
कॉंग्रेस पक्षाकडे ना नेता, ना निती असल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून ते सैरभैर झाले असून सध्या त्यांच्याकडे देशहिताचा कुठलाच मुद्दा शिल्लक नसल्याने सध्या त्यांच्याकडे फक्त परिवाराचाच प्रश्न शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी यांना टोला लगावत महाराष्ट्रात राहुल यांनी प्रचार सभा सुरू केल्याने भाजपाचा विजय आता निश्चित झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंचावर खा. जगदंबीका पाल,पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, राहुल ढिकले, रघुनाथ कुलकर्णी, वसंत गिते, सुनील बागूल, गिरीश पालवे, सतीश सोनवणे, विजय साने, महेश हिरे, बाळासाहेब पाटील, शशीकांत जाधव, जगन पाटील, राकेश दोंदे, मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, भाग्यश्री ढोमसे, अलका आहिरे, कैलास आहिरे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment