निवडणूक निकालानंतर कर्जतमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहणार नाही - पवार
माय नगर वेब टीम
कर्जत - निवडणूक निकालानंतर कर्जतमध्ये भाजपाचा रामही शिल्लक राहणार नाही असं वक्तव्य शरद पवार यानी केलं. नगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये शरद पवार हे रोहित पवार यांच्या प्रचारासाठी आले होते. त्याच प्रचारसभेत त्यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी पैलवान समोर दिसत नाहीत हे जे वक्तव्य केलं होतं त्याचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही मतं जरुर मागा, मात्र राज्यातील कुस्ती संघटनांचा अध्यक्ष मी आहे विसरु नका. तुम्हाला कुस्तीबाबत काही माहित नाही तर बोलता कशाला ? जेव्हा मांडायला काही मुद्दे नसतात तेव्हा माझ्याबाबत बोलता का ? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
एवढंच नाही तर भाजपाच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करायला कुणाला वेड लागलं आहे का? ज्या सरकारच्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करतात त्या सरकारला मत मागण्याचा अधिकार आहे का? असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला. कर्जत जामखेडच्या सभेला तरुणांची तुफान गर्दी होती. शरद पवार बोलत असताना कोण आला रे कोण आला? मोदी शाह यांचा बाप आला अशा घोषणा यावेळी तरुणांनी दिल्या. २१ तारखेला परिवर्तन करा. स्वतः मतदान कराच, पण सगळ्यांना मतदान करण्याचं आवाहनही शरद पवार यांनी केलं. आधी स्वतः मतदान करा आणि मग इतरांना मतदान करण्याचं आवाहन करा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Post a Comment