त्यांची भांडणे फक्त सत्तेसाठी ; आता बदल हवाय - मनसे


माय नगर वेब टीम

अहमदनगर - सध्याचे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही जनतेचे काहीही देणे-घेणे राहिलेले नाही, ते फक्ता सत्ता कशी मिळविता येईल, यासाठी भांडत आहेत. पक्षाचे विचार, ध्येय धोरणे याला तिलांजली देऊन प्रत्येकजण स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत. सत्ताधारी भाजप-सेना पक्ष प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा मोठ मोठी आश्‍वसने देऊन नागरिकांची दिशाभूल करत आहेत. लोकांचे उद्योग-धंदे बंद पडत आहेत, रोजगार जात आहे, युवकांना काम नाही, महिलांवर अत्याचार अशा सर्व गोष्टीमुळे महाराष्ट्र मागे पडत चालला आहे, आणि हीच परिस्थिती प्रत्येक शहराची आहे. नगरची अवस्थातर याहून वाईट म्हणावी लागेल. गेल्या 25-30 वर्षात नगरची प्रगतीच झाली नाही, आपल्या शेजारील पुणे, औरंगाबाद, नाशिक ही शहरे पुढे गेली परंतु आपण आहो तेथेच आहोत. खासदार, आमदार, महानगरपालिका यांचा वापर फक्त सत्तेसाठीच केला. आजही नगर शहरातील पाणी, रस्ते, लाईट, या मुलभुत सुविधाही हे लोकप्रतिनिधी देऊ शकले नाही. तेव्हा आता हा बदल करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक शहराच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. नगरमधील मनसेचे उमेदवार संतोष नामदेव वाकळे यांना शहराच्या विकासाची दूरदृष्टी आहे. नगरचा विकास मनसेच्या माध्यमातूनच होऊ शकतो, तेव्हा संतोष वाकळे यांना बहुमतांनी निवडून देऊन नगर विकासास चालना द्यावी, असे आवाहन महिला आघाडीच्या अनिता दिघे यांनी केले.

मनसेचे उमेदवार संतोष नामदेव वाकळे यांच्या प्रचारार्थ सावेडी गावातून प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, महिला आघाडीच्या अनिता दिघे, अ‍ॅड.नामदेव वाकळे, तुषार हिरवे, दिपक दांगट, अभिनय गायकवाड, गणेश शिंदे, अविनाश क्षेत्रे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सचिन डफळ म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या विकासासाठी कोणीही काही केले नाही. आता वेळ आली आहे, बदल करण्याची. जेव्हा सक्षम उमेदवार निवडून येतील तेव्हाच नगरचा विकास होणार आहे. त्यासाठी व्हीजन असलेल्या मनसेचे उमेदवार संतोष वाकळे यांना बहुमताने निवड द्यावे, असे आवाहन केले.

ही प्रचारफेरी सावेडी गाव, महालक्ष्मी उद्यान, भुतकवाडी, पंपींग स्टेशन, शिंदे मळा, ताठे मळा आदि भागातून काढण्यात आली. याफेरीस नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post