महाराष्ट्रात ३,२३७ उमेदवारांपैकी महिला उमेदवार फक्त २३५
माय नगर वेब टीम
मुंबई - मागच्या चार विधानसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या वाढत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ३,२३७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात २३५ म्हणजे फक्त ७.३ टक्के महिला उमेदवार आहेत. महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात १५२ मतदारसंघातून महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. पण हे आरक्षण विधानसभा निवडणुकीला लागू होत नाही. पुरुष उमेदवारांच्या तुलनेत महिला उमेदवारांचे प्रमाण पाहिले तर हा आकडा उत्साहवर्धक वाटणार नाही. १९७२ साली एकूण ५६ महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. पण एकाही महिला उमेदवाराला विजय मिळवता आला नव्हता. पण आता परिस्थिती बदलतेय. विविध राजकीय पक्षातील महिला महापालिकेत, विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी तिकीटाची मागणी करत आहेत. यावेळी राजकीय कुटुंबातील महिलांना मोठया प्रमाणावर उमेदवादी देण्यात आली आहे.

Post a Comment