आरोग्यमय सुखी जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही - आ.निलेश लंके


माय नगर वेब टीम
अहमदनगर - आरोग्यमय सुखी जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. सलग 39 वर्ष दिवाळी सुट्टीत शहरी व ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निंबळक येथे घेण्यात येणार्‍या दिवाळी क्रिकेट स्पर्धा कौतुकास्पद असून, युवकांना मोबाईलमध्ये न अडकता मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांनी केले.

नगर तालुक्यातील निंबळक येथे माजी सरपंच कै. संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित 39 व्या दिवाळी क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार लंके बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव, जि.प. सदस्य माधवराव लामखडे, प्रताप पाटील शेळके, माजी सरपंच विलास लामखडे, दत्ता पाटील सप्रे, उपसरपंच घनश्याम म्हस्के, ग्रा.पं. सदस्य बाबासाहेब पगारे, अजय लामखडे, केतन लामखडे, सुनिल जाजगे, बाळू कोतकर, अशोक कळसे, तौफिक पटेल, दादा झावरे, भाऊराव गायकवाड, मारुती कोतकर, एकनाथ होले, संभाजी गडाख, तुषार भुजबळ, बहिरु होळकर, नाना दिवटे, अशोक शिंदे, अंबादास पुंड आदींसह आदींसह खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे आमदार लंके म्हणाले की, निंबळक गटातून चांगले मताधिक्य मिळाले आहे. लामखडे यांच्या माध्यमातून या गटात विकास कामे झाली असून, आनखी विकास कामांना यापुढे गती मिळणार आहे. विजयाचे श्रेय सर्वसामान्य जनतेला जात असून, त्यांनी दाखवलेल्या प्रेम व विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. तर निंबळक गटातील प्रलंबीत कामे देखील मार्गी लावण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

प्रास्ताविकात विलास लामखडे यांनी शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ही स्पर्धा सिझन बॉलवर दिवाळीच्या सुट्टयात घेण्यात येते. स्पर्धेचे हे 39 वे वर्ष असून, अनेक उत्कृष्ट खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याचे सांगून, त्यांनी स्पर्धेची माहिती दिली. माधवराव लामखडे यांनी खेळाने मन, शरीर एकाग्र होते. अपयशाने खचून न जाता जिद्द व संयमाने पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा खेळाने मिळते. खेळाडूवृत्ती आत्मसात करणारा युवक जीवनात यशस्वी होत असल्याचे सांगून, निंबळक गटात केलेल्या विकास कामाचा आढावा घेतला.

निंबळकच्या ग्रीन हील स्टेडियम मध्ये होत असलेल्या दिवाळी क्रिकेट स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागातील 16 संघाना प्रवेश देण्यात आला आहे. अंतिम सामना शहर व ग्रामीणच्या विजयी संघात रंगणार आहे. स्पर्धा सिझन बॉलवर असल्याने उत्कृष्ट संघांचे शानदार प्रदर्शन क्रिकेट रसिकांना पहावयास मिळत आहे. मर्यादित क्रिकेट संघाचे सामने साखळी पध्दतीने खेळविण्यात येत असून प्रथम विजेत्या संघास 21 हजार रुपये, उपविजेत्या संघास 11 हजार रुपये, तृतीय संघास 7 हजार पाचशे रुपये व चतुर्थ संघास 5 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर उत्कृष्ट खेळाडूंना देखील आकर्षक रोख बक्षिस दिले जाणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दादा कांबळे, सागर कळसे, कैलास मोरे, निलेश दिवटे आदींसह निंबळकचे युवक परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल जाजगे यांनी केले. आभार बाळू कोतकर यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post