कोपरगावात आशुतोष पर्वाचा उदय



माय नगर वेब टीम
कोपरगाव - कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निकालाने शेवटपर्यंत श्‍वास रोखून धरला. अखेरच्या क्षणापर्यंत हृदयाचा ठोका चुकविणार्‍या मतमोजणीनंतर अखेर आशुतोष काळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यांना 87 हजार 566 मते मिळाली. त्यांनी भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचा 822 मतांनी निसटता पराभव केला. स्नेहलता कोल्हे यांना 86 हजार 744 मते मिळाली. निवडणुकीत रंगत आणणारे अपक्ष उमेदवार राजेश परजणे व विजय वहाडणे यांना डिपॉजिट वाचविण्यातही यश आले नाहीे. परजणे यांना 15 हजार 380 तर वहाडणे यांना चार हजार 32 मते मिळाली. अटीतटीच्या लढतीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे विजयी झाले. शेवटच्या फेरीपर्यंत कधी स्नेहलता कोल्हे पुढे तर कधी आशुतोष काळे पुढे अशी स्थिती निर्माण झाली.

सुरुवातीला तालुक्याच्या पश्‍चिम भागात आशुतोष काळे यांना आघाडी मिळाली. पहिल्या फेरीत आशुतोष 494, दसर्‍या फेरीत 710, तिसर्‍या फेरीत 2915, चौथ्या फेरीत मताधिक्य घटून ते 1448 इतके झाले. पाचव्या फेरीत 1294 मतांची आघाडी काळेंना मिळाली. त्यानंतर मात्र स्नेहलता कोल्हे यांनी आघाडी मिळविली. त्यांना सहाव्या फेरीत 1183, सातव्या फेरीत 3252, आठव्या फेरीत 2718 नवव्या फेरीत 2094 मतांची आघाडी घेतली. मात्र दहाव्या फेरीत त्यांची मते कमी होण्यास सुरुवात झाली. त्यांना 10 व्या फेरीत 981, 11 व्या फेरीत 855 मतांची आघाडी मिळाली. 12 व्या फेरीत पुन्हा आशुतोष काळे यांनी 2314 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर 13 व्या फेरीत 2 हजार 40 मतांनी आघाडी, चौदाव्या फेरीत 2419, पंधराव्या फेरीत 2 हजार 271, सोळाव्याफेरीत 3 हजार 515, सतराव्या फेरीत 2 हजार 414, 18 व्या फेरीपर्यंत त्यांनी 1 हजार 784 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र 19 व्या फेरीत त्यांना केवळ 454 मतांची आघाडी मिळाली. शेवटच्या 20 व्या फेरीत आशुतोष काळे यांनी 689 मतांची आघाडी घेतली. त्यात सैनिकांचे 7 तर 136 पोस्टल मते अशी एकूण 87 हजार 566 मते मिळाली. विरोधी भाजपच्या उमेदवार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांना 86 हजार 744 मते मिळाली. त्यांचा 822 मताच्या फरकाने निसटता पराभव झाला.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. 2014 मध्ये स्नेहलता कोल्हे यांना 29 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी मात्र भाजपाचे बंडखोर उमेदवार विजय वहाडणे व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अटीतटीची होणार असे स्पष्ट संकेत मिळाले होते. काळे यांचा बालेकिल्ला असलेल्या तालुक्याच्या पश्‍चिम भागात काळे यांनी सर्वच ठिकाणी आघाडी घेतली. मात्र कोल्हेंचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व भगात काळे यांनी बहुतांशी गावात चांगली मते घेतली. त्यामुळे स्नेहलता कोल्हे यांना बालेकिल्ल्यात मोठी आघाडी मिळू शकली नाही. कार्यकर्त्यांचा मोठा संच असतानाही कोपरगाव शहरात कोल्हे यांना कमी मते मिळाली. याउलट आशुतोष काळे यांनी शहरातून चांगली मते घेतली. शहरात मुस्लीम मतदार काळे यांच्या पाठीशी राहिले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्यात एक नंबरची मते घेतलेले विजय वहाडणे यांना यावेळी शहरातील मतदारांनी सपसेल नाकारले. वहाडणे यांनी आमदार कोल्हे पालिकेच्या कामात हस्तक्षेप करून कामे होऊ देत नाही असा सतत आरोप केला. गेली अडीच वर्ष वहाडणे कोल्हे संघर्ष कोपरगाव शहरवासीयांनी जवळून पाहिला. शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न दोघेही सोडवू शकले नाहीत. त्यामुळे या दोघांच्या विरोधात शहरात नाराजी वाढली होती. त्यातच काळे यांनी पाणीप्रश्‍नवर आंदोलने करून शहरवासीयांची सहानुभूती मिळविली.

त्यामुळे शहरवासीयांनी काळेंच्या झोळीत भरभरून मतांच दान टाकले. पूर्वभागातून स्नेहलता कोल्हे यांना मिळालेली अधिकची मते येथेच वजा झाली. त्यामुळे काळेंचा विजय सुकर झाला. कोल्हेंनी पोहेगाव परिसरात नितीन औताडे यांना सक्रीय करून बेरजेचे राजकारण केले. मात्र निळवंडेची शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाईपलाईन या निर्णयामुळे कोल्हेवर परीसरातील शेतकरी नाराज होते. त्यामळे औताडे यांना बरोबर घेऊनही फारसा फायदा या परीसरात झाला नाही. याउलट आशुतोष काळे यांनी कोल्हेंच्या या निर्णयाबाबत शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण करून तेथील नाराजीचा फायदा उचलत बेरजेचे राजकारण केले. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे राजेश परजणे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली. काळे कोल्हेच्या विरोधात तिसरा पर्याय म्हणून ते जनतेसमोर गेले. जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी त्यांच्यामागे ताकद उभी करत गणेश व प्रवरेचे कर्मचारी त्यांच्या मदतीला दिले. पुणतांबा परिसरातील विखेंचे कार्यकर्ते, सरपंच, जि. प. सदस्य यांना परजणे यांचे काम करण्याबाबत सूचना आल्या. मात्र याचा फारसा परिणाम झाला नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post