दुधात होतेय भेसळ ; दूध पिताना जरा जपून!
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश असूनही भारतीयांना शुद्ध दूध मिळत नाही. भारतीय अन्न सुरक्षा तसेच मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) तपासणीत प्रोसेस्ड म्हणजे पाकीटबंद दुधाचे ३७.७% नमुने गुणवत्तेच्या निकषांत फेल ठरले आहेत. नियमानुसार या निकषांत एकही नमुना दोषपूर्ण ठरायला नको. दुसरीकडे, सुट्या दुधाचेही ४७% नमुने दोषी ठरले. धक्कादायक बाब म्हणजे पाकीटबंद दुधाच्याही १०.४% नमुन्यांत मानकांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. सुट्या दुधाबाबत हा आकडा ४.८% आहे. पाकीटबंद आणि सुटे दूध असे एकूण ४१% नमुने दोषपूर्ण आढळले.
एफएसएसएआयचे सीईओ पवन अग्रवाल यांनी शुक्रवारी राष्ट्रीय दूध गुणवत्ता सर्व्हे-२०१८ जाहीर करून ही स्थिती गंभीर असल्याचे सांगितले. घेतलेल्या एकूण ६,४३२ नमुन्यांत सर्वाधिक भेसळ तेलंगणात, त्यानंतर मध्य प्रदेश व केरळमध्ये आढळून आली.

Post a Comment