अकोलेत डॉ. किरण लहामटे यांचा ऐतिहासिक विजय




माय नगर वेब टीम
अकोले  – अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे यांनी भाजपचे वैभव पिचड यांचा 57 हजार 789 मतांनी पराभव केला. या पराभवामुळे पिचड पिता-पुत्रांना 40 वर्षांनंतर प्रथमच पराभवास सामोरे जावे लागले. डॉ. लहामटे यांनी एक लाखापेक्षा अधिक मते मिळवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अकोले विधानसभा मतदारसंघात चार उमेदवार उभे असले तरी डॉ. लहामटे व वैभव पिचड यांच्यात सरळ लढत होती. तालुक्यातील विरोधकांमधील मतविभाजनाचा फायदा पिचडांना होत असल्याने यावर्षी एकास एक लढत घडवून आणण्याचे पिचड विरोधकांनी ठरविले होते. इच्छुक पाच उमेदवारांनी तशी शपथही घेतली होती. त्याप्रमाणे अकोल्यात सरळ लढत झाली. या लढतीत डॉ. किरण लहामटे यांना तब्बल एक लाख 13 हजार 414 मते मिळाली. वैभव पिचड यांना 55 हजार 725 इतक्या मतांवरच समाधान मानावे लागले.

राष्ट्रवादीने केलेला आक्रमक प्रचार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांच्या तालुक्यात झालेल्या सभा यामुळे निवडणूक निकालाबाबत जनतेमध्ये कमालीची उत्सुकता होती. काल गुरुवारी सकाळी 8 वाजता येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली. प्रथम टपालाने आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. नंतर प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्याच फेरीत डॉ. लहामटे यांनी एक हजार 285 मताधिक्य मिळविले. तेथून सर्वच्या सर्व 22 फेर्‍यांत त्यांना मताधिक्य मिळत गेले. प्रत्येक फेरीनिहाय त्यांच्या मताधिक्क्यात वाढ होत होती. आदिवासी भागासह मुळा-प्रवरा, आढळा, पठार भाग या सर्वच ठिकाणी त्यांना भरघोस मताधिक्य मिळाले.

डॉ. लहामटे यांच्या उमेदवारीला काँग्रेस, माकप, भाकप, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी विविध पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा होता. ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, अशोक भांगरे, डॉ. अजित नवले, कारभारी उगले, शांताराम वाळुंज, विनय सावंत, सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी, भानुदास तिकांडे, अमित नाईकवाडी, बाजीराव दराडे, मारुती मेंगाळ, पोपट दराडे आदींसह गावोगावच्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. आक्रमक पद्धतीने प्रचार केला. सोशल मीडियावर देखील लहामटे समर्थक सक्रीय होते. शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी डॉ. लहामटे यांच्यासाठी तालुक्यात प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे डॉ. लहामटे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती व या प्रचाराचे मतात रुपांतर करण्यातही ते यशस्वी झाले. वैभव पिचड यांच्या प्रचाराची धुरा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यासह तालुक्यातील भाजप-सेना, आरपीआयच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सांभाळली. बाहेरील कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा शेवटच्या दिवशी आमंत्रित करण्यात आली होती. मात्र खराब हवामानामुळे ते सभेला येऊ शकले नाहीत.

त्यामुळे महायुतीचा प्रचार म्हणावा तितका प्रभावी झाला नाही. निवडणुकीच्या तोंडावर पिचड पिता-पुत्रांनी केलेल्या पक्ष बदलाचाही त्यांना फटका बसला. या पक्ष बदलाबद्दल त्यांना ठिकठिकाणी नाराजीला सामोरे जावे लागत होते. राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांनाही हा पक्ष बदल मनापासून मान्य नव्हता. तसेच भाजप-सेनेचे अनेक कार्यकर्तेही त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे नाराज होते. तालुक्यातील विकासकामे मोठ्या प्रमाणात रखडली आहे. त्याबद्दलची नाराजीही आमदार म्हणून त्यांनाच सहन करावी लागली. तसेच चिन्ह बदलाचा मोठा फटका त्यांना बसल्याचे जाणवते. कमळ हे चिन्ह सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. या सर्वांचा परिणाम त्यांना मतदानात बसला. मतदारसंघाच्या सर्वच भागांत त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. आदिवासी भागातही त्यांना अपेक्षित मतदान झाले नाही. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली होती. लोकांना बदल हवा होता आणि तो त्यांनी मतपेटीद्वारे घडवून आणला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post