फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्याचे सूत्र ठरले आहे- उद्धव ठाकरे
माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपला सत्तेच्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर आले होते. त्यावेळी 50-50 चं सूत्रं ठरलं होतं. हे सूत्रं आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाने 144-144 जागा लढण्याचंही ठरलं होतं. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आमची अडचण समजून घेतील, अशी विनंती केली होती. त्यामुळे आम्ही त्यांची अडचण समजून घेत 124 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला.
मात्र यावेळी भाजपच्या कितीही अडचणी वाढल्या तरी त्या आम्ही समजून घेणार नाही. सत्ता वाटपात भाजपला समजून घेतले जाणार नाही. भाजपच्या सगळ्याच अडचणी समजून घेतल्या जाणार नाही. मलाही माझा पक्ष चालवायचा आहे, असही स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून भाजपला दिला. मात्र, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याच्या मुद्द्यावर भाष्य करणं टाळलं.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील. त्यानंतर आम्ही बसून निर्णय घेऊ. अमित शहा यांनी स्वत: यावं फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करावी. त्यानंतरच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल. मला सत्ता स्थापनेची काहीही घाई नाही, असंही उद्धव यांनी सांगितलं.

Post a Comment