Gandhi Jayanti 2019 : ‘या’ चित्रपटांमधून मिळाला राष्ट्रपिता गांधीजींच्या आठवणींना उजाळा
माय नगर वेब टीम
मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती. महात्मा गांधी यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा आढावा चित्रपटसृष्टीकडूनही घेण्यात आला. त्यामुळेच त्यांच्यावर आधारित अनेक हिंदी, मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या या राष्ट्रपित्याच्या विचारसरणीला चित्रपटांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आलं.भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींमध्ये महात्मा गांधींच्या योगदानाचा उल्लेख केला नाही, असं फार कमीच घडतं. त्यांच्या विचारांना रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याऱ्या काही चित्रपटांवर आपण नजर टाकणार आहोत.
१. गांधी (१९८२) –
‘गांधी’ या चित्रपटामध्ये बेन किंग्सले यांनी महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. गांधी या चित्रपटात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे वास्तवदर्शी चित्रण पाहायला मिळाले. आजवरच्या प्रभावी चरित्रपटांमध्ये ‘गांधी’ या चित्रपटाची गणना होते.
२. हे राम (२०००) –
‘हे राम’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली. या चित्रपटामध्ये कमल हासन, नसिरुद्दीन शहा यांच्या मुख्य भूमिका होत्या. साकेत राम ( कमल हासन) यांच्या आयुष्यावर महात्मा गांधी यांचा प्रभाव कसा पडतो याचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं होतं. शाहरुख खान आणि राणी मुखर्जीसुद्धा या चित्रपटातून झळकले होते.
३.लगे रहो मुन्नाभाई (२००६) –
गांधीजींच्या भूमिकेला वेगळ्याच पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आलेला चित्रपट म्हणजे ‘लगे रहो मुन्नाभाई’. २००६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. संजय दत्त ने साकारलेल्या ‘मुन्नाभाई’ या पात्राच्या आयुष्यात महात्मा गांधींच्या शिकवणुकीने किती फरक पडतो याचं रंजक चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं होतं.
४. गांधी, माय फादर (२००७) –
या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय खन्नाने महात्मा गांधी यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून गांधीजींच्या राजकीय कारकीर्दीवर नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला होता.
५. गांधी से महात्मा तक (१९९६) –
दक्षिण आफ्रिकेतून उच्चशिक्षण घेऊन भारतात परतेल्या व्यक्तीचा महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून पाहायला मिळाला.
Post a Comment