माय नगर वेब टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी नुकतंच राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोलही आहे. या पोल्समधून भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच साताऱ्यात मात्र धक्कादायक प्रकार घडला आहे. घडाळ्याचं बटण दाबल्यानंतरही मत कमळाला जात असल्याचा प्रकार कोरेगाव मतदारसंघात समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
'आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देण्यासाठी घडाळ्यासमोरील बटण दाबल्यानंतरही मत मात्र कमळाला जात आहे,' अशी तक्रार कोरेगाव मतदारसंघातील एका गावातील मतदारांकडून करण्यात आली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर असा प्रकार होत असल्याचं मान्य केलं. अखेर मग त्या गावातील ईव्हीएम मशीन बदलण्यात आलं आणि मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली.
देशभरात गेल्या काही निवडणुकांपासून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमबाबत आक्षेप नोंदवला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही ईव्हीएमवरच घेण्यात आली. मात्र आता साताऱ्यात हा प्रकार उघडकीस आल्याने ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Post a Comment