राठोड, शिंदे, पवार, राजळे, ढाकणे, यांच्या खर्चात आढळली तफावत ; १६ उमेदवारांना नोटिसा
माय नगर वेब टीम
अहमदनगर – कर्जत-जामखेड, शेवगाव मतदारसंघातील उमेदवारांची पहिली तर नगर शहर मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी सोमवारी झाली. यात १६ उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळली असून त्यांना निवडणूक निर्णय अधिकार्यांनी नोटीस बजावत ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांकडून होणारा खर्च योग्य रितीने होतो की नाही, यावर निवडणूक निर्णय अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यासाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाचा सर्व हिशोब ठेवणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी सोमवारी निवडणूक खर्च निरीक्षक नागेंद्र दिक्षीत यांनी कर्जत येथे केली. यात या मतदारसंघातील १० उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील निवडणूक खर्च सादर केला होता. यामध्ये राम शिंदे (भाजप), रोहित पवार (राष्ट्रवादी), बजरंग सरडे (अपक्ष), ज्ञानदेव सुपेकर (अपक्ष) आप्पासाहेब पालवे (मनसे) या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात त्रुटी व अनियमितता आढळून आली आहे. यावेळी सोमनाथ शिंदे व राम रंगनाथ शिंदे हे उमेदवार उपस्थित नव्हते. त्यांना अनुपस्थितीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस बजावली आहे.
पुढील निवडणूक खर्च तपासणी मंगळवारी (दि.१५) होणार आहे. शेवगावमध्ये खर्च निरीक्षक तन्वीर आर. रहेमान यांनी तपासणी केली. यामध्ये आ. मोनिका राजळे (भाजप), अॅड. प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी), प्रा. किसन जाधव (वंचित), कमरूद्दीन शेख व धीरज बताडे यांच्या खर्चाची तपासणी करण्यात आली. यात उमेदवार बताडे गैरहजर असल्याने त्यांना नोटीस बजावली आहे. तर आ. राजळे यांच्या खर्चात एक लाख २१ हजार ५९ हजार रुपये, अॅड. ढाकणे यांच्या खर्चात एक लाख चार हजार ४१३ रुपये ९५ पैसे आणि प्रा. जाधव यांच्या खर्चात १३ हजार २५०, शेख यांच्या खर्चात २६४ रुपयांची तफावत आढळली आहे. त्यांना दोन दिवसांत खुलासा करण्याचे सांगण्यात आले आहे. दुसरी तपासणी १७ ऑक्टोबरला होणार आहे.
नगर शहर मतदारसंघातील खर्चाची दुसरी तपासणी काल झाली. यात ६ उमेदवारांच्या खर्च अहवालामध्ये तफावत आढळून आली आहे. उमेदवार अनिल राठोड (शिवसेना) यांच्या खर्चात १ लाख २२ हजार ८६ रुपये, बहीरनाथ वाकळे यांच्या खर्चात ७ हजार ४१३ रुपये, श्रीपाद छिंदम यांच्या खर्चात रक्कम १ हजार ४२९ रुपये, मीर सुलतान यांच्या खर्चात तफावत रक्कम ५ हजार ५६८, श्रीधर दरेकर यांच्या खर्चात तफावत दोन हजार २८८ रुपये, संदीप सकट यांच्या खर्चात तफावत रक्कम रुपये ३२७ रुपये अशी आहे. या सर्व उमेदवारांना येत्या ४८ तासांत खुलासे करण्याचे आदेश निवडणूक खर्च निरीक्षक दिक्षीत यांनी दिले आहेत.
Post a Comment