वेब सिरीज बनतायेत मुक्त विचारांचे व्यासपीठ
माय नगर वेब टीम
मुंबई - मनोरंजनाची व्याख्या बदलली असून वर्षानुवर्षे चालणार्या प्रदीर्घ मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये असणार्या त्याच त्या रडक्या आणि रटाळ संवादांना बाजूला सारत आपल्याला हवे ते कार्यक्रम पाहण्याचा कल वाढू लागला. आताचा काळ त्याच्याही पुढे गेला आहे, सीरियलऐवजी वेब सीरिज ट्रेंडमध्ये असून या वेब सिरीजने वेड तरुणाईला लावले आहे.
इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे कमी वेळात अधिक मनोरंजन देणार्या वेबसीरिजकडे तरुणाईचा कल वाढलेला दिसून येतो. परदेशातल्या वेबसीरिजचं फॅड आपल्याकडेही लोकप्रिय होऊ लागलं आहे. वेबसिरीज म्हणजे कमीत कमी वेळेत, कमी खर्च आणि अधिकाधिक प्रसिद्धी हे समीकरण आहे. तसेच वेब सीरिजला सेन्सॉरशिप नसल्याने आपल्या कलेला अधिक वाव मिळतो. यामुळे तरुणाईला आवडणारे विषय त्यांना आवडतील अशा पद्धतीने मांडता येतात, बोली भाषा वापरता येते आणि कमीतकमी वेळात अधिकाधिक विषय सादर करता येतो.
साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी परदेशात सुरू झालेला वेबसीरिजचा प्रकार सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी भारतात आला आणि व्हायरल झाला. सुरवातीच्या काळात हिंदी वेब सिरीजचा बोलबाला अधिक दिसून येत होता. परंतु काही हौशी कलाकारांनी मराठीत हा प्रयोग केला आणि आज मराठीत असणार्या वेबसिरीज अधिक प्रसिद्ध झाल्या आहेत. मराठीत कास्टिंग काऊचं, स्ट्रगलर साला, भाडिपा आणि ग्रामीण भाषा वापरून महाराष्ट्रातील तमाम जनतेला वेड लावणार्या गावाकडच्या गोष्टी या वेब सीरिजने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. त्यानंतर ग्रामीण भागात अनेक वेब सिरीज उदयास आल्याने मराठी वेबसीरिजचा बोलबाला आहे. मराठी- हिंदी नंतर वेबसीरिजचा हा फंडा आता विविध भाषांत वापरण्यास सुरवात झाली आहे.
वेब सिरीज ही एखाद्या कथासंग्रहासारखी असून त्यामुळे कांदबरी वाचण्यापेक्षा आपण कथासंग्रह वाचण्यावर भर देत असतो, ज्यामुळे एकच एक गोष्ट बराच वेळ वाचण्याऐवजी वेगवेगळ्या विषयांवरील लहान-लहान कथा आपल्याला वाचायला मिळतात, तसेच काहीसे वेब सीरिजेसचे आहे. यामध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात असल्याने प्रेक्षकांना नवा पर्याय मिळतो आहे.
कॅमेरा इझी झाल्यामुळे आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण विषय मांडू शकतो. तसेच डिजिटल युग असल्याने अधिकाधिक लोकांपर्यत पोहचण्याचे साधन म्हणून वेब सिरीजकडे पाहिले जाते. वेबसिरीज खर्चिक नसल्याने खिशात वापरण्या इतके टूल असले तरी वेब सिरीज व्हायरल करता येते.
Post a Comment