माय नगर वेब टीम
अहमदनगर – सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत नगरकरांनी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना जोरदार दणका दिला. मतरूपी पावसात भाजपाचे मंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्यासह शिवाजीराव कर्डिले, सौ. स्नेहलता कोल्हे, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड या आमदारांना पराभवाची धूळ चाखावी लागली. विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादीने ‘कमबॅक’ करत जोरदार मुसंडी मारली. शिर्डीतून राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वाधिक 87 हजार विक्रमी मतांनी विजय मिळविला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आठव्यांदा विजयी झाले आहेत. मात्र शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, भाजपला तीन, तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. शिवसेेनेला एकही जागा मिळविता आली नाही. नेवाशात ‘क्रांतिकारी’ चे शंकरराव गडाख यांनी बाजी मारली. त्यांना राष्ट्रवादीचे बिनशर्त पाठिंबा दिला होता. कोपरगावात अटीतटीची लढत पहायला मिळाली. येथील निकाल दोन्ही बाजूनी बदलत असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक होती. अखेर राष्ट्रवादीचे आशुतोष काळे अवघ्या 829 मतांनी विजयी झाले. श्रीगोंद्यातही रंगतदार लढत पहायला मिळाली. कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे मंत्री राम शिंदे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. श्रीरामपूरची जागा पुन्हा काँग्रेसने राखली. येथून लहू कानडे यांची विजयाचा झेंडा फडकावला.

गुरूवारी सकाळी आठ वाजल्यापासून जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांत मोजणीला सुरूवात झाली. पहिल्या तासाभरात जिल्ह्यातील निकालाचे चित्र स्पष्ट झालेले दिसले. सुरूवातीपासून जिल्ह्यात राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचे दिसले. यात कर्जत-जामखेड, पारनेर, राहुरी, अकोले, नेवासा आणि नगर मतदारसंघात राष्ट्रवादी चमकदार कामगिरी करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दुसरीकडे शेवगाव-पाथर्डी तालुक्यात पहिल्या 12 फेर्‍यांपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे आघाडीवर होते. तर कोपरगावमध्ये सुरूवातीच्या काही फेर्‍यांमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आघाडीवर होते. मात्र, त्यानंतर त्याठिकाणी पुन्हा भाजपच्या स्नेहलता कोल्हे कोल्हे यांनी आघाडी घेतली. मात्र, अखेरच्या फेर्‍यांमध्ये अटीतटीची लढत होत अवघ्या 829 मतांनी काळे विजयी झाले. तर 14 हजार मतांनी शेवगाव-पाथर्डीत ढाकणे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या विजयी सर्वच आमदारांचे मताधिक्य हे विरोधकांना चक्रावून टाकणारे आहे.

जिल्ह्यामध्ये यंदा भाजपला मोठा फटका बसला आहे. पराभूत झालेल्यांमध्ये पालकमंत्री शिंदे, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले वैभव पिचड, ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे उपसभापती विद्यमान आमदार विजय औटी, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड नेवाशातील भाजपचे आ. बाळासाहेब मुरकुटे आणि श्रीरामपूरमध्ये काँग्रसेमधून शिवसेनेत

गेलेले विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा समावेश आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी 30 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला यश मिळाले. आघाडीतील मित्र पक्ष असणार्‍या काँग्रेसने दोन लढविल्या आणि त्या दोन्ही ठिकाणी त्यांना शंभर टक्के यश मिळविले आहेत. नगर मतदारसंघामध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस संग्राम जगताप यांच्यामध्ये लढत झाली, जगताप यांचा 10,940 मतांनी विजय झाला आहे. तर सलग दुसर्‍यांदा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत.

नोटाला 20 हजार 380 मते
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात नोटा (कोणीही लायक नाहीत) अशा नोटाला 20 हजार 380 मते मिळालेली आहेत. यात नगर 2724, राहुरी 1892, कोपरगाव 1622, कर्जत-जामखेड 897, श्रीरामपूर 2133, अकोले 2298, पारनेर 1479, श्रीगोंदा 1575, शेवगाव 2182, नेवासा 316, संगमनेर 1692, शिर्डी 1596 यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील उमेदवारांची पिछाडी हे आपल्या मनाला लागलेले शल्य आहे
शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकिर्दीत सातव्यांदा झालेला हा विजय सर्वात मोठा विजय आहे. मात्र जिल्ह्यातील भाजप-सेना उमेदवारांची पिछाडी हे आपल्या मनात शल्य आहे. जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला असता तर हा माझ्या विजयापेक्षा मोठा विजय ठरला असता. प्रत्येक मतदारसंघातील सामाजिक समीकरणे भिन्न आहेत. प्रचारात फारसा संबंध नसल्याने विश्‍लेषण अवघड आहे. जिल्ह्यातील निकाल हे धक्कादायक आहेत. राज्यात भाजपाला जे यश मिळाले ते मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे फलित आहे.
– राधाकृष्ण विखे पाटील, गृहनिर्माण मत्री

जनतेने साथ दिल्याने मोठे मताधिक्य
गेल्या महिन्यापासून पक्षाने प्रदेशची जबाबदारी दिल्याने मतदारसंघाला कमी वेळ देता आला. मात्र, कार्यकर्ते, पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी आणि जनतेने साथ दिल्याने मोठे मताधिक्य मिळविता आले. यासाठी सर्वप्रथम जनता, मतदार आणि कार्यकर्ते यांचे आभार मानणे गरजेचे आहे. मतदान झाल्यावर आणि मतमोजणी होण्यापूर्वी काही वृत्तवाहिन्यांनी जे सर्व्हे प्रसारित केले ते कोणासाठी होते, याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हे सर्व्हेक्षण करणार्‍या संबंधित वृत्तवाहिन्यांनी जनतेसमोर उभे करून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागायला हवी. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने सोबत जाण्यापूर्वी त्यासाठी पक्षश्रेष्ठीची मान्यता आवश्यक असून शिवसेनेने देखील त्यासाठी मानसिकता तयार कराला हवी. सेनेने भाजपच्या प्रभावा खाली राहायचे की नाही ते ठरवावे.
– बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

झेडपी सदस्य लहामटे बनले आमदार
अकोले तालुक्यात भाजपच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर थेट राष्ट्रवादीची उमेदवारी करत पिचड यांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावला. ते अकोले मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यापूर्वी अलिकडच्या काही वर्षात राहुल जगताप गत पंचवार्षिकला जिल्हा परिषद सदस्य असताना राष्ट्रवादीकडून तर मोनिका राजळे भाजपच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य असताना आमदार म्हणून निवडून आलेले होते. आता लहामटे त्यांच्या पाउलावर पाऊल ठेवत आमदार झाले आहेत.

सहा नवीन तर चार तरुण चेहर्‍यांना संधी
जिल्ह्यातील विधानसभेचा निकालात मतदारांनी सहा नवीन चेहर्‍यांना विधानसभेत पाठविले असून यात चार तरुणांचा समावेश आहेत. तरुण चेहर्‍यांत रोहित पवार, नीलेश लंके, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे यांच्यासह डॉ. किरण लहामटे आणि लहू कानडे यांचा नवीन चेहर्‍यांचा समावेश आहेत. यासह संग्राम जगताप आणि मोनिका राजळे यांना सलग दुसर्‍यांना तर शंकरराव गडाख आणि बबनराव पाचपुते यांना पाच वर्षांच्या खंडानंतर विधानसभेत पाठविलेले आहे. थोरात आणि विखे हे पारंपारिक आणि ज्येष्ठ चेहरे पुन्हा विधानसभेत चमकणार आहेत.

जावई विजयीसासरे पराभूत
नगर जिल्हा हा सोयरे-धायरे यांचे राजकारण असणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात एकमेकांचे नातेवाईक असणारे मात्र वेगवेगळ्या पक्षात असणारे अनेक नेते आहेत. असेच एक राहुरीचे भाजपचे आ. शिवाजीराव कर्डिले आणि नगर शहरातील राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप हे सासरे जावई आहेत. विधानसभेच्या निकालात कर्डिले यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्याकडून दारूण पराभव झाला. तर नगरमध्ये जावई जगताप यांनी शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा पराभव केला. यामुळे जावई निवडून आलेला असताना सासर्‍यांचा मात्र पराभव झालेला आहे.

थोरात आठव्यांदा तर
विखे सातव्यांदा आमदार
संगमेनर मतदारासंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यंदा आठव्यांदा, तर शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला आहे. यात थोरात राज्याच्या विधानसभेत सर्वात ज्येष्ठ आमदार ठरणार आहेत. गेल्या 40 वर्षांपासून थोरात हे संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करत आहेत. यापूर्वी विधानसभेत शेकापाचे गणपतराव देशमुख 9 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. यापूर्वी देशाच्या संसदेत ज्योती बसू यांच्या नावावर हा मान होता. दरम्यान, शिर्डी मतदारसंघातूनही सातव्यांदा राधाकृष्ण विखे पाटील निवडून आलेले आहेत. 1995 साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर राधाकृष्ण विखे पाटील आमदार झाले. 1997 आणि 1999 साली शिवसेनेकडून ते आमदार राहिले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये येत 2004, 2009 आणि 2014 मध्ये आमदार झाले. आता पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत ते आमदार झाले आहेत.

अन् श्रीगोंद्याचा निकाल काही काळ राखून ठेवला
श्रीगोंदा तालुक्यात भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते 5 हजार 750 मतांनी विजयी झाले होते. मात्र, मतमोजणी दरम्यान एका मताचा हिशोब लागत नसल्याने विरोधी उमेदवार घनश्याम शेलार यांनी त्यावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली. एका मताचा विषय असल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी फेरमोजणीची मागणी फेटाळली. यामुळे शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. यामुळे काही काळ निकाल राखून ठेवण्यात आला. त्यानंतर आयोगाच्या सुचनेनुसार पाचपुते यांना विजयी घोषित करण्यात आले आणि विजयाचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले.




0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post