वीज पडून आठ जणांचा मृत्यू



माय नगर वेब टीम
अकोला - अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि अकोट तालुक्यात वीज पडून चौघांंचा मृत्यू झाला. बुधवारी ३० ऑक्टोबरला ही दुर्घटना घडली. त्यात अकोट तालुक्यातील शेतमजूराचा तर तेल्हारा तालुक्यात १२ वर्षीय मुलीसह तिघांचा समावेश आहे. या तालुक्यातील दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. अकोट तालुक्यातील घटनेत अन्य एक जण जखमी झाला आहे.


तेल्हारा तालुक्यात बुधवारी 30 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी पावसासह विजांच्या कडकडाट झाला. यात तालुक्यातील भोकर शेत शिवारात वीज कोसळल्याने 12 वर्षीय मुलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. तालुक्यातील भोकर शेतशिवारात भोकर येथील अढाऊ कुटुंब, वरुड येथील गणेश मोकळकर हे अजबराव बिहाडे यांच्या शेतात कापूस वेचण्यास गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसासह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. पावसापासून बचावकरीता शेतातील मजुरांनी झाडाचा आडाेसा घेतला. परंतु दुर्दैवाने त्याच झाडावर वीज कोसळली. यात गजानन गुलाबराव अढाऊ (वय २७), लक्ष्मी नागोराव अढाऊ (वय १२), गणेश मोकळकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मीना गोपाल नारे (वय ३२) वैष्णवी नागोराव अढाऊ (वय १६) व नागोराव गुलाबराव अढाऊ (वय ४) हे तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.



अकोट तालुक्यातील लाडेगाव शिवारात ज्वारीची कापणी करताना वीज कोसळून शेतमजूर दादाराव पळसपगार रा. बेलुरा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर दुसरा शेतमजूर अनिल पंचांग गंभीर जखमी झाले. दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात हलवले असता उपचारानंतर अनिल पंचांग यांना अकोला येथे पाठवले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post