
माय नगर वेब टीम
मुंबई : २०१४ च्या तुलनेत महत्त्वाची मंत्रिपदे मिळण्यासाठी शिवसेनेकडून सुरू असलेल्या दबावतंत्राला यश येत आहे. उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदे शिवसेनेला देण्यास भाजप तयार आहे. तसा अधिकृत प्रस्तावही शिवसेनेला देण्यात आला असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. यात सार्वजनिक बांधकाम खात्यासह अन्य महत्त्वाची खाती शिवसेनेकडे सोपवण्यात येणार आहेत. या खात्यांबाबत चर्चा सुरू असून एक-दोन दिवसांत यादी अंतिम हाेण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक गुरुवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाेणार असून त्यात पक्षाचा गटनेता निवडला जाणार आहे.
बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५० च्या फॉर्म्युल्याची माहिती नसल्याचे सांगताच शिवसेनेने युतीमधील बैठकच रद्द केली हाेती. त्यामुळे युतीत तणावाचे वातावरण हाेते. मात्र, फडणवीस यांनी युतीत बैठकांचे सत्र सुरू असल्याचे स्पष्ट केले. युतीतील सत्तावाटपाबाबत भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, दाेन्ही पक्षांत सत्तावाटपाचे काही फॉर्म्युले तयार आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे. शिवसेना आमचा मित्रपक्ष असल्याने त्यांचा आम्ही योग्य तो मानसन्मान ठेवत आहोत. गेल्या वेळी त्यांना १४ मंत्रिपदे दिली हाेती. या वेळी १६ ते १७ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचीही ऑफर देण्यात आलेली आहे. अजून यावर अंतिम निर्णय झालेला नसला तरी एक-दोन बैठकांत अंतिम निर्णय होऊ शकताे, असेही या नेत्याने सांगितले.
Post a Comment