'उड्डाणपुलाच्या कामात शिवसेना-राष्ट्रवादीचे अडथळे'


माय नगर वेब टीम
अहमदनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळाला असल्याने राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे.

जिल्ह्यात पक्षाचे काम करत असून विधानसभा निवडणुकीत नगर शहरातील भूमिकेबाबत तीन दिवसानंतर निर्णय जाहीर करू, असे स्पष्टीकरण माजी खा.दिलीप गांधी यांनी दिले. दरम्यान उड्डाणपुलाच्या कामात शिवसेना व राष्ट्रवादीने अडथळे निर्माण केल्याचा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला.

पाच वर्षात भाजपने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गांधी बोलत होते. या पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, श्रीकांत साठे उपस्थित होते. अनिल राठोड यांच्या उमेदवारीस विरोध तसेच शहरात भाजप - शिवसेना युतीच्या प्रचारात गांधी सक्रिय नसल्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता, मी भाजप म्हणून निवडणुकीत सक्रिय आहे. पक्षाने जेथे जबाबदारी दिली आहे तेथे काम करीत आहे. बुधवारी श्रीगोंद्यात प्रचारासाठी गेलो होतो.

त्यामुळे शिवसेनेच्या सभेला उपस्थित राहू शकलो नाही. श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी गेलो होतो, असे सांगून नगर शहराबाबत तीन दिवसानंतर भूमिका जाहीर करू , असे गांधी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेस राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सर्वदूर महायुतीस पोषक वातावरण आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा दावा त्यांनी केला. नगर शहरात ड्रेनेज लाईन व फेज टूसाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. ही कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय नगर - दौंड रस्ता, रेल्वे दुहेरीकरण, शिर्डी विमातनळ आदी कामे पूर्ण झाली आहेत. बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी दहा दिवसांपूर्वी शंभर कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. उड्डाणपुलाच्या युटीलिटी कामांसाठी १७ कोटी २४ लाखांचा निधी राज्य सरकारने दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

उड्डाणपुलाचे काम विनाकारण ३ वर्षे रखडले. उड्डाणपुलास २०१५ मध्येच मंजुरी मिळाली होती. त्यावेळी महापालिकेत राष्ट्रवादी व शिवसे नेची सत्ता होती. महापालिकेने उड्डाणपुलाचा ठराव करू दिला नाही. उड्डाणपुलाच्या कामात राष्ट्रवादी व शिवसेनेने अडचणी आणल्या, असा आरोप गांधी यांनी केला.

लोकप्रतिनिधी निष्क्रिय
नगर शहरातील विकासकामांबाबत गांधी यांना विचारले असता, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. देनेवाला व्दारपर खडा है ; लेकीन लेनेवाले की पात्रता होनी चाहिए, असे सांगून ते म्हणाले की, शहरातील विकासकामांसाठी लोकप्रतिनिधीनेही प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही, असा आरोप त्यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post