शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे बुडवणारे श्रीगोंद्याचा काय विकास करणार?- घनश्याम शेलार
माय नगर वेब टीम
श्रीगोंदा - विधानसभा निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्याने हभप च्या दारु व मटणाच्या पार्ट्या सुरू झालेल्या आहेत. लोकांना आमिषे दाखवली जात आहेत खोटी आश्वासने दिली जात आहेत. ज्यांनी शेतकऱ्यांनी कष्टाने पीकविलेल्या ऊसाचे पैसे बुडविले ते मतदार संघाचा काय विकास करणार असा आरोप राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार घनश्याम शेलार यांनी बबनराव पाचपुते यांच्यावर केला. ते नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके हे होते. यावेळी आमदार राहुल जगताप, नगर तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संपतराव म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा दरेकर, भारतीय जन संसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, चिचोंडी पाटील चे माजी उपसरपंच शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी बोलताना शेलार म्हणाले की खोटं बोल पण रेटून बोल या विचाराने आजवर यांनी जनतेला फसवले. जनता विश्वास ठेवत गेली आणि यांनी जनतेचा विश्वास घात करण्याचा कार्यक्रम केला. पण लबाडी फार काळ चालत नाही, जनतेला आता सर्व काही समजले आहे. निवडणूक जनतेने हाती घेलल्याने विरोधी उमेदवाराने आता पार्ट्या सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या घामाच्या ऊसाचे पैसे ज्यांनी बुडविले ते आपला काय विकास करणार, त्यांना आता जनताच जागा दाखवून देईल असेही शेलार म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीरंग कोकाटे यांनी केले. यावेळी माजी उपसरपंच शरद पवार यांनी आपल्या मनोगतातून भाजपाच्या धोरणाविषयी कडाडून टीका केली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे यांनी भाजपाच्या नेत्यांच्या लबाड अश्वासनाचे पुरावे सादर करत वृत्तपत्र कात्रणे दाखवली.
जनसंसदेचे जिल्हाअध्यक्ष सुधीर भद्रे यांनी आपल्या मनोगतातून भाजपा उमेदवाच्या समाचार घेतला.
यावेळी बोलतांना आ. राहुल जगताप यांनी यापुढेही शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना अडचणीत येऊ येऊ देणार नाही अशी ग्वाही दिली. माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अशोक कोकाटे यांनी आभार मानले.

Post a Comment