माय नगर वेब टीम
अहमदनगर- शेतकऱ्यांना शेतीबाबत योग्य ते मार्गदर्शन व्हावे, शेती बाबतच्या शासकिय मदत शेतकऱ्यांना मिळावी व्हावी म्हणून तालूका निहाय कृषी विभागाची निर्मीती करण्यात आली आहे. पण कृषी विभागाचे काम पहाता हा विभाग नक्की शेतकरी हिताचे काम करतो की व्यापारी हिताचे हा प्रश्नच आहे. नगर तालूक्यातील ज्वारीची पेरणी संपून १५ दिवस उलटल्यानंतर कृषी विभागाने आता अनुदानित बियाणे उपलब्ध करून दिले आहे तर हरबरा पेरणी सुरू असूनही अदयाप हरबरा अनुदानित बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे पेरणी संपल्या नंतर अनुदानित बियाणे उपलब्ध करून देणाऱ्या कृषी विभागाचे वरातीमागून घोडे सुरू आहेत. दरम्यान शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्यात कृषी विभागाचा 'हात' असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
नगर तालूका हा रब्बी हंगामी तालूका आहे. तालुक्यात तब्बल ५ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी केली जाते. त्यातही प्रामुख्याने ३ लाख ७५ हजार हेक्टर वर ज्वारीची तर ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर हरबऱ्याची पेरणी केली जाते. उर्वरित क्षेत्रावर पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू, कांदा, मका अशी पिके घेतली जातात. वर्षानुवर्ष नगर तालूक्यात श्रावणी पोळयानंतर लगेच ज्वारीची पेरणी केली जाते. ऑगस्टचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबर पहिला आठवडा हा ज्वारी पेरणी साठी योग्य मानला जातो. या काळात अनुदानित बियाण्यांसाठी कृषी विभागाकडे शेतकरी चकरा मारत होते. पण ते शेतकऱ्यांना मिळाले नाही. परिणामी एकरी साधारणपणे चार ते पाच किलो प्रमाणे बाजारात ६० ते ७० रूपये किलोप्रमाणे ज्वारीचे बियाणे विकत घ्यावे लागले. आणि आता कृषी विभागाने पेरणी नंतर तब्बल २० दिवसांनंतर अनुदानित बियाणे उपलब्ध करून दिले आहे.
हरबरा बियाणे पेरणीचा कालावधी हा नगर तालूक्यात सप्टेंबर अखेर पर्यत असतो पण अदयापही नगर तालूका कृषी विभागाकडे अनुदानित हरबरा बियाणे उपलब्ध नाही.परिणामी शेतकऱ्यांना ८० ते ८५ रूपये प्रती किलो प्रमाणे बाजारातून बियाणे विकत घ्यावे लागत आहे. आता काही दिवसांनी कृषी विभाग हरबरा बियाणे उपलब्ध करून देईलही पण तोपर्यत हरबरा पेरणी होवून गेलेली असेल. त्यामुळे अनुदानित बियाण्यांबाबत कृषी विभागाचे वराती मागून घोडे अजून किती दिवस सुरू रहाणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. कृषी विभाग आणि बियाणे विक्रेते यांच्या आर्थिक देवाण घेवाणीतूनच शेतकरी लुटीचा हा प्रकार होत असल्याच्या संतप्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.
कृषी विभाग आणि व्यापारी यांची सेटलमेंट
हरबरा १० किलो बियाणेसाठी ८१० रूपये मोजावे लागत आहेत. नगर तालूक्यात पाऊस कमी आहे.ओल कमी आहे. हरबरा बियाणे आता पेरले तर काहीतरी पिक हाती लागेल. कृषी विभागाकडे अनुदानित हरबरा बियाण्याबाबत मागणी केली असता. अदयात बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगत उडवा उडवीची उत्तरे दिली. पण बियाणे महामंडळाकडे चौकशी केली असता आंम्ही १ महिन्यापूर्वीच बियाणे मागून ठेवले आहे. पण कृषी विभागाची मागणी नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वेळेवर मिळू नये यासाठी कृषी विभाग आणि बियाणे विक्रेते यांची ही सेटलमेंट आहे. त्यात शेतकरी मात्र लुटला जात आहे.
- दत्तात्रय रोहकले
Post a Comment