माय नगर वेब टीम
अहमदनगर - आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय मैदान तापले आहे. उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी होम टू होम प्रचार सुरू केला असला तरी समाज माध्यमातून आरोप प्रत्यारोपाचे मेसेज व्हायरल होत आहेत. प्रचारात एमआयडीसीतील आयटी पार्कचा मुद्दा कळीचा ठरत आहे. आ. संग्राम जगताप यांच्याकडून आयटी पार्कमुळे तरूणांना रोजगार दिला असल्याचे सांगत २५ वर्षात एमआयडीसीत दहशत करून अनेक कंपन्या बंद पाडण्यासाठी राठोडांनी प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. तर दुसरीकडे आयटी पार्कच्या नावाखाली जनतेला मुर्खात काढण्याचा उद्योग जगताप यांनी सुरू केल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमातून केला जात आहे.
दोन्हीकडील समर्थकांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल केला जात आहेत. एकंदरीत नगर शहर मतदारसंघात 'आमदारकी'चा सोशलवॉर दिसून येत आहे.
नगर शहर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेर १७ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले. आघाडीकडून आ. संग्राम जगताप, शिवसेनेकडून अनिल राठोड, वंचितकडून किरण काळे, बसपाकडून श्रीपाद छिंदम, मनसेकडून संतोष वाकळे, कम्युनिस्टकडून बहिरनाथ वाकळे आदीसह १७ जणांनी २१ अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच प्रचाराला प्रारंभ झाला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘गुलाल घेवून या, अन् लाल दिव्याची गाडी घेवून जा’ असे सुचक वक्तव्य करत राठोड यांना मंत्रीपद देण्याचा अप्रत्यक्ष शब्द दिला. यावर राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा अनिलभैय्या म्हणत प्रचाराला प्रारंभ केला. हा धागा पकडत आ. संग्राम जगताप यांनी आमदारकीसाठी वन्समोअर नको तर नगरच्या विकासासाठी, तरूणांच्या रोजगारासाठी वन्समोअर पाहिजे, असे आवाहन करत प्रचाराचा शुभारंभ केला. आ. जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज हा आयटी पार्कमध्ये रोजगार मिळालेल्या तरूणांच्या उपस्थितीत दाखल केला.
नगरच्या प्रचारात ‘रोजगार’ हा मुद्दा कळीचा ठरत आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी व्हीजन, डेव्हल्पमेट व संरक्षण या त्रीसुत्रीच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून आयटी पार्कमध्ये त्यांनी पार्टनरशिप सुरू केली आहे. आयटी पार्कच्या नावाखाली जनतेला मुर्खात काढण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका अनिल राठोड यांनी केला. तर आ. संग्राम जगताप यांच्याकडून वन्समोअर विकासासाठी म्हणुन प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच राठोडांना मत का द्यायचे? असा प्रश्न उपस्थित करत नगर ३५ वर्षे मागे जावे म्हणुन, एमआयडीसी बंद पडावी म्हणुन, जातीय दंगली घडाव्यात म्हणुन. अशा विविध घडलेल्या घटनांच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. तर राठोड समर्थकांकडून जगतापला मत का द्यायचे? नगर मध्ये पुन्हा दुहेरी हत्याकांड होऊन माता भगिनींचे संसार उद्धवस्त व्हावे म्हणून, एमआयडीसी मध्ये उदयोजकांवर दहशत करून त्यांना पळून लावावे म्हणून, एसपीओफिसवर हल्ला करावा म्हणून, महापौर यास मारहाण करावी म्हणून, गरीब जनतेच्या जागांवर ताबा मारावा म्हणून असा मुद्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
निवडणुकीत सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असून इतर उमेदवारही कामाला लागले आहेत. उमेदवारी अर्ज छाननीमध्ये तीन जणांचे अर्ज बाद झाले असून १४ जणांचे १८ अर्ज राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून कोणाला कोणाचा फायदा व तोटा होतो, हे येणारा काळच ठरविल. मात्र, सध्या नगर शहरात सोशल वॉर पहायला मिळत आहे.
छिंदम, काळे कोणाला पाडणार...
नगर शहर मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप, महायुतीचे उमेदवार उपनेते अनिल राठोड यांच्यासह १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वंचितकडून किरण काळे, मनसेकडून संतोष वाकळे, कम्युनिष्टकडून बहिरनाथ वाकळे, बसपाकडून श्रीपाद छिंदम यांच्यासह ११ जणांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. तसेच त्यांनी प्रचाराचा शुभारंभही केला आहे. नगर शहर मतदारसंघात दोन्ही भैय्यांमध्ये महामुकाबला होणार असून छिंदम, काळे, वाकळेंच्या मतांचा फटका कोणाला बसणार याची आकडेमोड नगरच्या राजकीय पटलावर जोरदारपणे सुरु आहे.
Post a Comment