सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील लढाई प्रतिष्ठेची केली असून आज भर पावसात भाजप, शिवसेना आणि उदयनराजे भोसले यांच्यावर पवार बरसले. पवारांनी आपल्या खास शैलीत सत्ताधारी पक्षांची धुलाई केली.
सातारा या ठिकाणी शरद पवार जेव्हा सभा घेत होते त्याचवेळी पाऊस पडू लागला. मात्र शरद पवार यांनी भाषण न थांबवता भर पावसात कार्यकर्त्यांचं संबोधन सुरु ठेवलं. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले. सातारा या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. ते बोलत असताना पाऊस आला. मात्र शरद पवार यांनी न थांबता भाषण सुरु ठेवलं. त्यांच्या या कृतीमुळे सभेला उपस्थित असलेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आहे. प्रचाराची सांगता व्हायला आता काही तासच उरले आहेत. उद्या शनिवारी सायंकाळी प्रचार थांबणार आहे. त्याआधी आज महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळाला असताना शरद पवार यांच्या सभांनीही राज्याचे लक्ष वेधून घेतले.
आज सकाळी पंढरपूर, नंतर अंबाजोगाईमध्ये जाहीर सभा घेतल्यानंतर सायंकाळी पवार साताऱ्यात धडकले. साताऱ्यात राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केल्याने व ते आता भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवत असल्याने सातारा जिंकण्यासाठी पवार आपली 'पॉवर' वापरत आहेत. म्हणूनच शरद पवारांनी आज शेवटच्या टप्प्यात साताऱ्यात जंगी सभा घेतली.
विशेष म्हणजे पवार भाषणासाठी उभे राहताच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पवारांच्या भाषणावर पाणी पडणार, असे सर्वांना वाटत होते. मात्र पवारांनी पावसाची पर्वा केली नाही. भर पावसात त्यांनी फटकेबाजी सुरू केली. न थांबता पवारांनी १० मिनिटं तडाखेबंद भाषण केलं. यादरम्यान त्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला झोडपून काढले. नंतर त्यांनी आपला मोर्चा उदयनराजेंकडे वळवला.
उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली ही माझी चूक होती, असे सांगतानाच ही चूक सुधारण्यासाठी सगळेच सातारकर २१ तारखेची वाट पाहत आहेत, असे पवार म्हणाले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला साक्षात वरुणराजाने आशीर्वाद दिले आहेत आणि त्या आशिर्वादाच्या बळावर सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.


Post a Comment