अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांची लवकरच शिवसेनेत घरवापसी होणार

माय नगर वेब टीम
अहमदनगर- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे तसेच माजी नगरसेवक राजेंद्र राठोड यांची लवकरच शिवसनेते घरवापसी होणार असून यासंदर्भात या दोघांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी दिली.

महापालिकेच्या महापौर निवडणुकीत उमेदवारी डावलल्यामुळे गेल्या 10 वर्षांपुर्वी ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे नाराज होवून शिवसेनेपासून दूरावले होते. तर राजेंद्र राठोड यांनीही नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने उपनेते अनिल राठोड यांना उमेदवारी दिल्यानंतर सोमवार (दि.30) पासून त्यांनी पुन्हा नव्याने पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शिवसेनेतील नाराजांची नाराजी काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेपासून दुरावलेले जुने शिवसैनिक पुन्हा जोडण्याचे प्रयत्न अनिल राठोड यांच्यासह जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांनी सुरु केले आहेत. मंगळवारी (दि.1) दुपारी अंबादास पंधाडे व राजेंद्र राठोड यांनी शिवालयात अनिल राठोड व शिवसेना पदाधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पंधाडे यांनी आपण शिवसेनेपासून दुरावलो होतो तरी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नव्हता. आता पुन्हा एकदा शिवसेनेत सक्रिय होवून शेवटच्या श्‍वासापर्यंत जय महाराष्ट्र म्हणणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. लवकरच त्यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याचे विक्रम राठोड यांनी सांगितले.

संग्राम जगतापांबरोबरच शेवटच्या श्‍वासापर्यंत राहणार – सारंग पंधाडे

आमचे वडील सुरुवातीपासून कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेपासून अलिप्त झाल्यानंतर इतर कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नव्हता. त्यांची शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसोबत पुन्हा दिलजमाई झाली असेल. परंतु, आपणास राजकारणात जो मान मिळाला तो आ. संग्राम जगताप यांच्यामुळेच. त्यामुळे आपण शेवटच्या श्‍वासापर्यंत आ. संग्राम जगताप यांच्या बरोबरच राहणार असल्याची प्रतिक्रिया अंबादास पंधाडे यांचे पुत्र व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सारंग पंधाडे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post