मनपातील सेवानिवृत्त कर्मचार्यांची दिवाळी होणार गोड
माय नगर वेब टीम
अहमदनगर - दिवाळीपुर्वी अहमदनगर महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकार्यांची थकित देयके मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा नगरपालिका व महापालिका पेन्शनर असोसिएशनने मंगळवारी (दि.22 ऑक्टोबर) महापालिके समोर निदर्शने करुन मनपाचे मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकर यांना घेराव घातले. अनेक वर्षापासूनचे थकित देयके मिळत नसल्याने पेन्शनर्सना जीवन जगणे कठिण झाले असून, पैश्यांच्या प्रतिक्षेत अनेक पेन्शर्ननी शेवटचा श्वास घेतला मात्र त्यांना थकित देयके मिळाली नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. याची तातडीने दखल घेत मुख्य लेखाधिकारी यांनी 2009 पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची 70 लाखाची रक्कम तातडीने अदा करीत असल्याचे आश्वासन दिले. या पैश्याने या वर्षीची दिवाळी गोड होणार असल्याने सेवानिवृत्त कर्मचार्यांनी आनंद व्यक्त करीत मनपा प्रशासनाचे आभार मानले.
सेवानिवृत्त झालेल्या मनपा कर्मचार्यांची नोव्हेंबर 2016 पासून अद्यापि पेन्शन व इतर देयके न दिल्याने पेन्शन धारकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात महापालिकेस वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील प्रशासनाकडून पेन्शन देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील दिवाळीत देखील देयके अदा न झाल्याने पेन्शनर्सना समाधानकारक दिवाळी साजरी करता आली नव्हती. यावर्षी संघटनेच्या वतीने आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले होते. या आंदोलनात एन.एम. पवळे, मधुकर खताळ, आर.के. गावडे, डी.यू. देशमुख, सुशिल शेलार, शांता शेकटकर, अनिस पठाण, चिराग शेख, डी.एम. टेपाळे, वसंत गायकवाड, डी.एल. खांडेकर, केशव राऊत, रामदास वाखारे, सुदाम मोरे, नंदकुमार सातपुते, रफीक शेख आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावर्षी दिवाळीपुर्वी सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची उर्वरीत रक्कम मिळणार असल्याने सेवानिवृत्त कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मुख्य लेखाधिकारी मानकर यांनी पेन्शनर्सना वेळोवेळी पेन्शनची रक्क अदा करुन, थकित देयके देण्याचा मनपा प्रशासन सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तर दिवाळीनंतर महागाई फरकाची रक्कम 50 व 60 लाख रुपये देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
संघटनेने वेळोवेळी महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकार्यांची थकित देयके मिळण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, याचे श्रेय संघटनेच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांना जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना ही स्थिती चांगली होण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचारी देखील सहयोग देणार असल्याची भूमिका एन.एम. पवळे यांनी स्पष्ट केली.
Post a Comment