केडगाव देवी यात्रेला देवीभक्तांची मांदियाळी
माय नगर वेब टीम
अहमदनगर : केडगावच्या रेणुका माता मंदिरात आज सातव्या माळे निमित्त देवीची यात्रा भरली होती. पहाटेच्या आरती पासुनच देवी भक्तांची दर्शनासाठी लांबलचक रांग लागली होती. यात्रेमुळे भाविकांची दिवसभर मोठी गर्दि होती. दुपारच्या पावसामुळे मंदिर परिसरातील छोटे दुकानदार व भाविकांची चांगलीच दाणादाण उडाली.
केडगावच्या रेणुका देवीची सातव्या माळेला यात्रा भरते. यात्रेनिमित्त आज पहाटे महापुजा करण्यात आली. यानंतर देवीला फुलोराचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. पहाटे पाच ला आरती झाली. यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दि झाली. पहाटेपासुन सुरु झालेल्या दर्शन रांगा पावसाचा व्यत्यय वगळता रात्री उशिरापर्यत सुरू होत्या. केडगाव, नगर शहर व तालुक्यातील भाविकांनी आज देवीच्या दर्शनासाठी गर्दि केली होती. यात्रेनिमित्त परिसरातील मंडळांनी देवीला वाजत गाजत येऊन साडी चोळी अर्पण केली. भाविकांसाठी विविध संस्थाच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. बालगोपाळांनी विविध पाळणे व मनोरंजनाच्या खेळांचा आनंद लुटला. कोतवाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. केडगावच्या शांतता समितीच्या सदस्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत केली.
दुपारी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायीकांची चांगलीच धावपळ उडाली. काहींची नुकसान टाळण्यासाठी दाणादाण उडाली .भाविकांचीही पावसामुळे चांगलीच त्रेधातिरपट उडाली . मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती . सोमवारी नवव्या माळेला मंदिराच्या समोर होमहवण होणार असुन दसऱ्याला शस्त्र पुजन व महापुजा होणार आहे.
Post a Comment