'विधानसभा निवडणुकिसाठी सज्ज व्हा'
माय नगर वेब टीम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका मुक्त, शांततापूर्ण, निर्भयपणे पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी केले.
विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वय अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे उपस्थित होते.
आयकर विभागाने अवैध रोकड वाहतुकीवर छापा टाकणे आणि जप्तीबाबत कारवाईच्या दृष्टीने एक प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, अशी सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी केली. रेल्वे विभागाने इव्हीएम वाहतूक तसेच पोलीस आणि सुरक्षा दलांची वेळेत वाहतूक व्हावी याबाबत काळजी घ्यावी. इतर राज्यातून वाहनांची जास्त प्रमाणात ये-जा होणाऱ्या मार्गांवर रोकड आणि मद्य वाहतुकीबाबत अधिक दक्षतेने कारवाई करण्याच्या सूचनाही श्री. सिंह यांनी दिल्या.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनाबाबत माहिती दिली. निवडणुकीदरम्यान बेनामी रोकड वाहतूक जप्ती, अवैध मद्यवाहतूकीविरुद्ध कार्यवाही, नक्षलग्रस्त भागात अधिकची सुरक्षाव्यवस्था, तपासणी नाके आदींबाबत आढावा घेऊन यावर्षी इव्हीएमच्या स्ट्राँगरुमला एक अधिकस्तर सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी अतिरिक्त सुमारे 400 कंपन्यांची मागणी केल्याबाबत माहिती दिली.
परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी इव्हीएम वाहतूक तसेच निवडणुक प्रशासनासाठी वाहनांच्या उपलब्धतेबाबत नियोजनाची माहिती दिली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान आलेल्या अनुभवांची माहिती देऊन निवणुकीसाठी नियोजन करण्यात आलेल्या जलद प्रतिसाद पथक आणि विमानतळ गुप्तचर पथकांबाबत माहिती दिली. पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलटच्या (ईटीपीबी) तसेच साध्या पोस्टल मतांच्या वाहतुकीबाबत नियोजनाची माहिती दिली.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा याही उपस्थित होत्या. केंद्रीय राखीव पोलीस बल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ), रेल्वे, महाराष्ट्र वस्तु व सेवा कर विभाग, नार्कोर्टिक्स कन्ट्रोल ब्युरो, भारत संचार निगम लि., भारतीय विमानतळ प्राधिकरण, सीमा शुल्क विभाग, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी संगणकीय सादरीकरण करुन आपापल्या विभागाकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती याप्रसंगी दिली.
Post a Comment