मानधन वाढीसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा
माय नगर वेब टीम
अहमदनगर -
मानधन वाढीच्या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आणि अहमदनगर जिल्हा आशा संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून मंगळवारपासून आमरण साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनात जनरल सेक्रेटरी ॲड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा सुवर्णा शिंदे, सतीश पवार, मंगल शिंगणे, निर्मला खोडदे, स्वाती इंगळे, कोमल कासार, शोभा गायकवाड, कविता गिरे, अर्चना असणे, वंदना गायकवाड, यमुना गव्हाणे, कल्पना भोर जिल्ह्यातील जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व गटप्रवर्तक महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना मानधन अत्यल्प आहे. यासंदर्भात 4 जून रोजी मुंबई येथे संयुक्त कृती समितीतर्फे आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते परंतु याबाबत काहीही कारवाई झालेली नाही. स्थानिक व राज्यस्तरीय प्रश्नावर 19 जुलै रोजी जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यात आले. यानंतर पुन्हा विचार ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आल्या त्यावेळी निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले. अद्यापि याबाबत ठोस कार्यवाही झाली नसून काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्य कृती समितीच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील सर्व अशा गटप्रवर्तक जिल्हा परिषदेसमोर चक्री आमरण उपोषण करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment