नगरचे पैलवान विधानसभेच्या आखाड्यात ? ; खा.विखेंशी बंद खोलीत झाली चर्चा





माय नगर वेब टीम

अहमदनगर - आगामी विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात १२-० ची घोषणा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात व्ह्यूवरचना आखली जात आहे. नगर शहरात जगताप, राठोड, गांधी यांचा राजकीय वाद सुरु असतांनाच खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेचे नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांच्याशी तब्बल अडीच-तीन तास बंद खोलीत चर्चा केली. ही बातमी नगरच्या राजकीय वर्तुळात वार्‍यासारखी पसरली असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पैलवान लोंढे यांनी यापूर्वी नगरचे आखाडे गाजवले आहेत. आता विधानसभेचा आखाडा गाजविण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून बोलले जात आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीची आचासंहिता आठ-दहा दिवसानंतर कोणत्याही क्षणी लागू शकते. अशी परिस्थिती आहे. विधानसभेत जिल्ह्यात 12-0 करण्याचा चंग ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बांधला आहे. त्यादृष्टीने संगमनेर, नगर, राहुरी मतदारसंघात ना. विखे व खा. विखे पाटील यांनी लक्ष घातले आहे. नगर शहरात 25 वर्ष आमदार असलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड प्रबळ दावेदार असले तरी आ. संग्राम जगताप हे शिवसेनेच्या तिकिटासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी हे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्यासाठी नगरच्या जागेवर दावा करत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी नगरचे मैदान तापू लागले आहे. त्यातच माजी खा. गांधी यांनी राठोड यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.






दरम्यान, खा. सुजय विखे पाटील यांनी नगरमध्ये येत शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोेंढे यांच्याशी बंद खोलीत तब्बल अडीच तास चर्चा केली. त्यांच्यामध्ये नगरच्या राजकारणाविषयी चर्चा झाली असल्याचा अंदाज बांधला जात असून शिवसेनेचे नगरसेवक पै. सुभाष लोंढे हे विधानसभेच्या आखाड्यात उतरतात की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पै. लोंढे यांना मानणारा मोठा वर्ग नगर शहरात आहे. तसेच त्यांनी महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपदही भूषविलेले आहे. तब्बल 5 वेळा नगरसेवक ही झाले आहेत. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून विखे परिवाराचे ते निकटवर्तीय मानले जात असल्याने पै. लोंढे यांचा विधानसभेसाठी विचार केला जावू शकतो असा अंदाज नगरच्या राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post