श्रीगोंदयाचे राजकारण धक्कादायक वळणावर ; पाचपुतेंना धोक्याची घंटा!



हर्षवर्धन पाटील, खा. विखे, आ. जगताप, नागवडेंची बंद खोलीत चर्चा

माय नगर वेब टीम

अहमदनगर –आगामी विधानसभेच्या अनुषंगाने श्रीगोंदयाचे राजकारण धक्कादायक वळणावर जाऊन पोहोचले आहे. त्यातच नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात बंद खोलीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुजय विखे, कारखान्याचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, दीपक नागवडे यांच्यात बैठक झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. यावेळी आमदार राहुल जगतापही उपस्थित होते असे सांगितले जात आहे. बंद खोलीत विधानसभेचा प्लॅन ठरला असला असून ही बैठक माजी मंत्री पाचपुतेंसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.




हर्षवर्धन पाटील हे भाजपात लवकरच प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. नागवडे हेही भाजपा नेत्यांशी संपर्कात आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी सुरुवातीला विख-नागवडे यांच्यात संवाद घडवून आणला. त्यानंतर आमदार जगताप यांना बैठकीत बोलविले. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्या शब्दांवर खा. सुप्रिया सुळे यांना मदत केली. पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर मतदारसंघावर दावा केला. परंतु, प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी स्पष्ट धोरण घेतले नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे. त्यावर पाटील यांनी भाजपाशी मैत्री करून इंदापूरमध्ये युती पुरस्कृत उमेदवारी करण्याची व्यूहरचना आखली आहे.



खासदार विखे यांच्या उपस्थित श्रीगोंद्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे श्रीगोंद्यात नवे राजकीय समीकरणे जुळण्याची चिन्हे आहेत. या नेत्यांमधील बंद खोलीतील चर्चेने पाचपुते समर्थकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. आगामी काळात श्रीगोंदयाच्या राजकारणात कोणती कलाटणी मिळतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post