
माय नगर वेब टीम
अहमदनगर- विद्युत खांबाला ताण देण्यासाठी लावलेल्या तारेत वीज पुरवठा उतरल्याने विजेचा धक्का बसून म्हैस दगावली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या गलथानपणामुळे म्हैस दगावली असल्याने शेतकऱ्यास तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील शेतकरी राहुल राजाराम धामणे हा गावाजवळील टेंभी टेकडीवर जनावरे चारण्यासाठी गेला होता. बुधवारी (दि.१८) दुपारी १२.३० च्या सुमारास या टेकडी परिसरात असलेल्या विजेच्या खांबाला ताण दिलेल्या तारेजवळ म्हैस गेली असता त्या तारेत विद्युत प्रवाह उतरलेल्या असल्याने विजेचा धक्क बसून म्हैस जागेवरच गतप्राण झाली. याबाबत सदर शेतकऱ्याने तसेच परिसरातील नागरिकांनी तातडीने महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर या परिसराचा विज पुरवठा खंडीत करत अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कामगार तलाठी तसेच नगर तालुका पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. जिल्हा परिषदेच्या वाळकी केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नांदे यांनी मृत म्हशीचे शवविच्छेदन केले असता विजेच्या धक्क्याने सदर म्हशीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महावितरणकडून उडवा-उडवीची उत्तरे
ग्रामीण भागात महावितरणच्या वीज वाहिन्या टाकलेल्या आहेत तेथे सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना केलेल्या नाहित. विद्युत खांबाला ताण देण्यासाठी ज्या तारा लावल्या आहेत त्यांना वर चिनी मातीच्या चिमण्या बसविणे गरजेचे असताना या परिसरात एकाही खांबाला तशा चिमण्या बसविल्या गेलेल्या नाहीत. घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे नुकसान भरपाई मिळणेबाबतच्या प्रक्रियेची माहिती विचारली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. ही म्हैस विजेच्या धक्क्याने नव्हे तर अन्य कुठल्या कारणाने दगावली असेल. त्या तारेमध्ये विद्युत प्रवाहच उतरलेला नव्हता असा दावाही या अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केलेला आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांची जनावरे तसेच शेतकरीही महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेचा धक्का बसून मृत्युमुखी पडतात. मात्र, महावितरणकडून त्यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबत लोकप्रतीनिधींनी लक्ष घालण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.
Post a Comment