'ते' शब्द मागे घेतो - खा. सुजय विखे



माय नगर वेब टीम

अहमदनगर - साकळाई सिंचन योजने बाबत लोक सभा निवडणुकीनंतर मंत्रालयात तीनवेळा बैठका झाल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. या योजनेचे काम सर्वांच्या सहभागाने मार्गी लावू, असे सांगतानाच भाजप सरकार आल्यावरच कामांना गती मिळाली असल्याचा दावाही खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. दरम्यान गुंडेगाव येथील कार्यक्रमात मी ' देखणा माणूस ' असा शब्द वापरला होता. कोणत्याही स्त्रीचा, महिलेचा उल्लेख मी केलेला नाही. कुणालाही उद्देशून हे वक्तव्य मुळीच नव्हते. काहींना वाटते मी त्यांच्या बद्दल बोललो. मात्र, तसा मुळीच उद्देश नाही. माझ्या शब्दांमुळे कुणाच्या व्यक्तिगत भावना दुखावल्या असतील तर मी ' ते ' शब्द मागे घेतो, असे स्पष्टीकरण सुजय विखे यांनी अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या आरोपावर केले आहे.

खासदार विखेंनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, साकळाई सिंचन योजना व्हावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत, याबद्दल कुणाचेही दुमत नाही. आम्हाला श्रेयवाद करायचा नाही. काहींनी आंदोलन केली, त्यात काहीजण सहभागीही झाले. त्यांनी त्यांच्या मार्गाने प्रयत्न केले. सर्वांचा सहभाग घेऊन ही योजना मार्गी लावायची आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, नगरमधील उड्डाणपुलाचे भूसंपादन तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते. येत्या आठवडाभरात ते पूर्ण होईल व त्यानंतर दीड ते दोन महिन्यात कामाला सुरुवात होईल. १७ कोटींचा निधीही भूसंपादनासाठी वर्ग झालेला, असे खासदार विखे यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post