'पूर्वा'च्या पावसाने जिल्हा ओलाचिंब


माय नगर वेब टीम

अहमदनगर - दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसाने शहराच्या गल्लीबोळातील रस्ते पाण्याखाली गेले. या रस्त्यांवर जागोजागी खड्डे असल्यामुळे दुचाकी आणि तीनचाकी वाहनधारकांची वाट काढताना चांगलीच त्रेधा उडत होती. या पावसाने शहरातील सखल भागाला तळ्याचे स्वरुप आले होते. दरम्यान पूर्वाच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी नगर शहर आणि परिसरात पूर्वा नक्षत्राने जोरदार हजेरी लावत शहरात पाणीच पाणी केले होते. ऐन गणेशोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी वरुणराजाने हजेरी लावत गणेशभक्तांना दिलासा दिला होता. त्यानंतर मात्र एक-दोनदा शहरात पूर्वाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी उत्तरा नक्षत्राने प्रवेश केला. चौथ्या दिवशी काल (दि.17) अचानकपणे उत्तरा नक्षत्राने जोरदार आगमन करत शहर आणि परिसरातील जनतेला सुखद धक्का दिला.

सकाळी पावसाचे वातावरण नसताना, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसास सुरुवात झाली. क्षणात सावेडी, पाईपलाईन रोड, माळीवाडा, औरंगाबाद रोड , नवीन पेठ आदींसह शहरातील रस्त्यांवरुन पाणी वाहू लागले. साडेतीन तासांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शहराच्या सर्वच भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. शहराच्या सर्वच रस्त्यांवर कमी-अधिक अंतरावर खड्डेेच खड्डे असल्याने वाहनधारकांना गाड्या चालविताना अंदाज येत नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी तीनचाकी आणि दुचाकी वाहनधारकांची तारांबळ उडत होती.

नगर शहरातील माळीवाडा, सावेडी, नालेगाव, हातमपुरा, मुकुंदनगर, झेंडीगेट, सर्जेपुरा, कल्याणरोड, कापडबाजार , काटवण खंडोबा आदी ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील सर्वच रस्त्यांवरुन पाणी वाहू लागले होते. सायंकाळी सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नोकरदार मंडळीची तारांबळ उडाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post