जिल्हा बँकेला "सहकार निष्ठ" पुरस्कार प्रदान


माय नगर वेब टीम
अहमदनगर -
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत राज्यातील सहकारी संस्थांना त्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल सहकार महर्षी, सहकारभूषण व सहकारनिष्ठ असे पुरस्कार आज सहकार मंत्री नामदार सुभाष देशमुख यांच्या शुभहस्ते नाशिक येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या विभागातून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सहकारनिष्ठ पुरस्कार नामदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते बँकेच्या वतीने चेअरमन सिताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन रामदास पाटील वाघ, संचालक अंबादास पिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, सरव्यवस्थापक किशोर भिंगारकर, जनसंपर्क अधिकारी भारत पाटील यांनी स्विकारला.


याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय सदस्य श्री महागावकर , खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सिमा हिरे, राज्याचे सहकार आयुक्त श्री सतीश सोनी, पणन आयुक्त किशोर तोष्णीवाल, राज्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,संचालक, अधिकारी तसेच अनेक जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक,ऑडिटर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनासहकार नाही उद्धार हे सहकाराचे ब्रीदवाक्य घेवून जिल्ह्याच्या भूमीमध्ये रुजलेले सहकाराचे बीज आणि एकमेकास सहाय्य करू हे ध्येय घेऊन जिल्ह्याच्या विकासाची मातृसंस्था म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना दिनांक ३/१०/१९५७ रोजी झाली व प्रत्यक्षरूपात कामकाजास दिनांक १ मे १९५८ रोजी झाली.
अहमदनगर जिल्हा बँक हि जिल्ह्याची कामधेनू संस्था असून आशिया खंडातील मोठी अग्रगण्य व प्रसिद्ध बँक आहे. राज्यात उच्यांकाची उलाढाल करणारी जिल्हा सहकारी बँक म्हणून तिची ओळख आहे. बँकेच्या ५ हजार ८२१ सहकारी संस्था व ९०८ असे एकूण ६ हजार ७२९ सभासद आहे. जिल्ह्यात २८७ शाखा व १० विस्तार कक्ष कार्यरत असून, कोअर बँकिंग पद्धतीने संगणीकरण झालेले आहे. तसेच जिल्ह्यात बँकेचे ४५ ए .टी.एम कार्यान्वित आहे.
बँकेला स्थापनेपासून उत्कृष्ट् नेतृत्व लाभलेले आहे. नगर जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारी जिल्हा बँकेमुळे वाढलेले आहे. त्यामुळे नगर जिल्हयाला साखर कारखान्यांचा जिल्हा अशी ओळख प्राप्त झालेली आहे. सहकारी चळवळीतील जनक कै. विठ्ठलराव विखे पाटील, कै. मोतीभाऊ फिरोदिया ,कै. भाऊसाहेब थोरात, कै. मारुतराव घुले पाटील अशा अनेक दिग्गज मान्यवरांचे बँकेस नेतृत्व लाभले आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, दुग्धसहकारी संस्था अशा अनेक संस्था निर्मितीस जिल्हा बँकेचा मोलाचा वाटा आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज वितरण, शासनाच्या विविध योजना, सहकारी सोसायट्या मार्फत शेतकरी सभासदांमार्फत विविध योजना पोहोचवणे, त्यातून स्वतःचा, सहकारी संस्थाचा, गावांचा व जिल्ह्याचा विकास साधने, देशातील साधनसंपत्तीत शेतीमालाचे उत्पादन वाढवून भर घालणे, कष्टकरी - कामकरी शेतकरी व दुर्बल या सर्व थरातील जनतेकडून निधी जमवून त्यातून गरजूंना कर्जपुरवठा करणे, विविध बँकिंग सुविधा ग्राहकांना देऊन सौजन्यशील व जलद सेवा देणे इत्यादी उद्दिष्ट्ये समोर ठेऊन जिल्हा बँक हा सहकाराचा वटवृक्ष झाला आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला राज्यशासनाने ''सहकारनिष्ठ" पुरस्कार देऊन जिल्ह्यातील सहकारी चळवळीला मोठा सन्मान दिलेला आहे. बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, व्हॉईस चेअरमन रामदास पाटील वाघ व माननीय संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्यकार्यकारीअधिकारी रावसाहेब वर्पे व सेवक बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अविरत कार्यतत्पर आहे.
तसेच अहमदनगर शहराच्या वैभवात भर पाडणारे अद्यावत असे ७५० आसनक्षमता असलेले यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह हे भव्य व्यासपीठ सहकारचवळीसाठी उपलब्ध करून दिले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post