'जल पुनर्भरणासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग हाच प्रभावी उपाय'
माय नगर वेब टीम
अहमदनगर - जलसंकटातून बाहेर पडायचे असेल तर जमिनीतील जलसाठा वाढविला पाहिजे.जलसाठा वाढवायचा असेल तर जलपुनर्भरण केले पाहिजे.जल पुनर्भरणासाठी आपल्या घराचे छतावर, अंगणात आणि शेतात पडणारे पावसाचे पाण्याचे रेनवॉटर हार्वेस्टिंग केले पाहिजे. रेनवॉटर हार्वेस्टिंग हाच जलपुनर्भरणासाठीचा प्रभावी उपाय आहे असे प्रतिपादन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.
अहमदनगर येथील रंगारगल्लीतील डॉ.महाले मंगल कार्यालयात माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या अहमदनगर क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो कार्यालयाचे वतीने आयोजित "जलशक्ती अभियान" कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री.फुलारी बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप,शिक्षकनेते प्राचार्य सुनील पंडित, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये व पी .कुमार, कृषी अधिकारी श्री. नलगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जलमित्र फुलारी म्हणाले, देशावर-राज्यावर आलेल्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली केंद्र सरकारने स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली.2023 पर्यंत घर घर जल हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविले जात आहे.या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे.
जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले यांनी शेती, शेतकरी व जलसंधरणाचे केलेले कार्य उभे केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी पुरवठ्याची दुसरी कोणतीच सोय नसतांना केवळ पावसाचे रुपाने निसर्गाने दिलेले पाणी योग्य रीतीने गडावरच साठवून वर्षभर सैन्य व पशुधन यांना वर्षभर पुरेल एवढ्या पाण्याचा साठा केला जात होता.तीच पाणी योजना आजही गडकिल्यावर टिकून आहे.गडकिल्यावरील हि पाणी व्यवस्था रेनवॉटर हार्वेस्टिंगचे आदर्श मॉडेल आहे.सर्वानी याचा अभ्यास करून आपापल्या घरी, शेतात आणि गावात रेनवॉटर हार्वेस्टिंगची उपायोजना केली तर भविष्यात कधीच पाणी टँचाई निर्माण होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या घरी,शाळेत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.जगताप म्हणाले,सध्या शेतीच्या पाणी वापरा बाबद आपल्या समोर पाणी किती द्यायचे, पाणी कस द्यायचं आणि पाणी द्यायच कुठे हे तीन प्रश्न आहेत. माणसं, जनावरे, शेती आणि उद्योगासाठी पाणी लागते. जमिनीतील पाणी साठा कमी कमी होत चालला आहे तसेच पावसाची अनियमीतताही आहे.
पुढ्याच्या पिढीला पाण्याचा ठेवा हस्तांतरित करायचा असेल तर रेनवॉटर हार्वेस्टिंग करून जल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भावी पिढीला जल संकटाचा सामना करावा लागू नये यासाठीच हे जलशक्ती अभियानाचे उपक्रम आहेत.
केज जि.बीड येथील शाहीर तांबे यांच्या कलापथकाने जलजागृती करणारे पोवाडे सादर केले.
यावेळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यानी पाणी शहरातून जलजागृती फेरी काढून पाणी आडवा पाणी जिरवा,पाणी वाचवा जीवन वाचवा, पाणी बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती असे नारे देऊन पाणी बचतीचा संदेश दिला.
रेनवॉटर हार्वेस्टिंग, पारंपारिक जलस्रोंचे नुतनीकरण, पाण्याचा पुर्नवापर, वनीकरण व जल व्यवस्थापन-जल संवर्धन आदी महत्वाच्या विषयांचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते.
पाणी फाउंडेशनचे समन्वयक संतोष दहिफळे,हरियालीचे सुरेश खामकर आदीसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभय यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाची माहिती दिली. तर प्राचार्य सुनील पंडित यांनी आभार मानले.
Post a Comment