माय नगर वेब टीम
मुंबई : लग्नसमारंभ, हॉटेलिंग यासाठी राज्यातले गडकिल्ले आता भाडेतत्वावर मिळण्याची शक्यता आहे. एमटीडीसीच्या वतीनं यासाठी राज्यातील 25 किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. निवड केलेले 25 किल्ले 60 ते 90 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे मावळे चांगलेच सरकारवर संतावले असून सोशल मीडियावर टीकेचा भडिमार सुरू आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार स्थानिक पर्यटकांमध्ये हेरिटेज टुरिझम अर्थात गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू यांच्या पर्यटन वाढले आहे. पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले हेरिटेज हॉटेलियर्स आणि हॉस्पिटॅलिटी चेन्सना भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. या किल्ल्यांना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाबाबत राज्य मंत्रिमंडळाने तीन सप्टेंबर रोजी निर्णय घेतला होता. संरक्षित स्मारकांच्या यादीमध्ये नसलेले आणि सरकारी जमिनीवर नसलेले राज्याच्या मालकीचे किल्ले भाड्याने देण्यास या नवीन धोरणांतर्गत एमटीडीसीला मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान या निर्णयाचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर निषेध केला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियात देखील या विरोधात तरुणांचा विरोध पाहायला मिळत आहे.
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हे
सरकारचा हा निर्णय संतापजनक आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न या निमित्ताने करावासा वाटत आहे. जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं असल्याचा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. विकास हवा पण गडकोटांचं पावित्र्य राखूनच हवा. शाश्वत विकासाच्या दृष्टीने इतिहासाशी प्रामाणिक राहून विकास करावा, अशी मागणी देखील कोल्हे यांनी केली आहे.
किल्ले भाड्याने दिले जाणार नाही- मंत्री रावल
लग्नसमारंभ, हॉटेलिंग यासाठी राज्यातले गडकिल्ले 60 ते 90 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली होती. मात्र किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. गडकिल्ल्यांच्या बाबतीत ही चुकीची अफवा पसरविण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
शिवरायांच्या किल्ल्यांना नख लागू देणार नाही – मुख्यमंत्री
छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना नख लागू देणार नसल्याच वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केल आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की गड किल्याचे संवर्धन भाजपनेच केले आहे. ज्याप्रमाणे रायगडाचा विकास केला. त्याचप्रमाणे इतर किल्ल्यांचा विकास करणार असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितल.
Post a Comment