त्यांना गांधी नको होता ना मग आता आम्हाला राठोड नकोय !




माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहराचे गेल्या पंचवीस वर्षात वाटोळे करण्याचे काम झाले. भावनेचे राजकारण केले. कायम येथील जनतेला भुलवले अन् त्याचे परिणाम आज नगरकर भोगत आहेत. त्यामुळे आता नगरच्या जनतेला बदल हवा आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत असलेला विकास पाहून नगरच्या जनतेलाही आता परिवर्तन हवे आहे. त्यामुळे ही जागा भाजपालाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच नगरमध्ये ' त्यांनी ' पंचवीस वर्षात काय दिवे लावले ? युती झाली तर ही जागा भाजपाकडे असेल आणि सेनेकडेच राहिली तर त्यांचा उमेदवार राठोड असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेऊ. त्यांना गांधी नको होता ना मग आता आम्हाला राठोड नकोय ! त्यांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेणार असल्याचे माजी खासदार तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नगरमध्ये येत आहेत. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत गांधी बोलत होते . यावेळी शहर सरचिटणीस बोरा , श्रीकांत साठे, सुवेंद्र गांधी उपस्थित होते.
 नगर शहरात संस्कारी पालकाची भूमिका गेल्या २५ वर्षात त्यांनी घेतली नाही. त्यांनी कायमच खालच्या पातळीवरचे राजकारण केले आणि त्यातून हिडीस प्रकार केले. नगरच्या जनतेला आता विकास हवा आहे, भावनेचे मुद्दे आणि त्यावर आधारीत मते मागणारे नको आहेत. गेल्या पंचवीस वर्षात नगरमध्ये एकही मोठा कारखाना, उद्योग आला नाही आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ते असल्याचा घणाघातही त्यांनी केला. पंधरा वर्षे मी खासदार होतो. केंद्राच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची कामे मी मतदारसंघात केली अन् नगर शहरात केली. चांगले काम आणले की त्यात आडकाठी आणण्याचे पाप कायमच त्यांनी केले असा आरोपही गांधी यांनी राठोड यांचा नामोल्लेख टाळत केला. अलिकडच्या पाच वर्षात मोदी सरकारच्या माध्यमातून केलेली सार्वजनिक आणि व्यक्तीगत लाभाची कामे सर्वांच्या समोर आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मी विद्यमान खासदार असताना व पक्षादेश मी पाळला असताना माझ्याबद्दल राठोड व त्यांचे समर्थक काय बोलले हे जगजाहीर आहे. त्या निवडणुकीत माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलले गेले. तरीही मी पक्षाच्या उमेदवाराला अडचण नको म्हणून शांत राहिला. त्यांना ( राठोड ) भविष्याची चिंता त्यावेळी वाटली नाही. मग, आता मी चिंता का करू ? नगरची जागा भाजपाला मिळणार असून आम्ही त्यावर आग्रही आहोत. मात्र , युती झाली अन् सेनेच्या वाट्याला ही जागा गेली तर राठोड सोडून अन्य कोणालाही उमेदवारी द्या अशी मागणी करणार आणि तो उमेदवार निवडून आणणार अशी ठाम भूमिकाही गांधी यांनी मांडली. नगरमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मते भाजपाला मिळाली आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीतही समोरचा उमेदवार नगर शहरातील असतानाही भाजपा उमेदवाराला निर्णायक आघाडी मिळाली असल्याचे गांधी यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post