प्रतिक्षा संपली ; शिवसेना-भाजपा जागावाटपावर तोडगा....
माय नगर वेब टीम
मुंबई - काही दिवसांवर येऊ ठेपलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपाच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल व त्यात शिवसेनेशी युतीबाबतची भूमिकाही याच बैठकीत निश्चित केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेबरोबरच्या जागावाटपावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा दिल्लीच्या बैठकीकडे लागल्या आहेत.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतीच दिल्लीत महाराष्ट्रातील जागा व उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळी परदेशात असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. मोदी हे शनिवारी रात्री परदेश दौऱ्यावरून भारतात परतले आहेत. आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे उमेदवार व युतीच्या जागावाटपावर त्यावेळी अंतिम निर्णय घेण्यात येईल. मोदी यांच्याबरोबरच अमित शाह, जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होतील, असे सांगण्यात आले. भाजपाने केलेल्या सर्वेक्षणात निर्विवादपणे जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय ज्या ठिकाणी दोन उमेदवार स्पर्धेत आहेत अशा जागांची वेगळी यादी आहे. या दोन्ही याद्या पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ठेवून त्यांच्या संमतीने अंतिम यादी निश्चित केली जाईल. तसेच युतीच्या जागावाटपावरही निर्णय होईल, अशी माहितीही देण्यात आली.
Post a Comment