काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड





माय नगर वेब टीम
नवी दिल्ली  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली आहे. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी 3 जुलै 2019 रोजी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामाही या बैठकीत मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्राचे मुकूल वासनिक आणि कर्नाटकचे मल्लिकार्जुन खरगे यांची नावं अध्यक्षपदासाठी संध्याकाळपर्यंत चर्चेत होती. मात्र अचानक सोनिया गांधी यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही नेत्याच्या नावावर एकमत होऊ शकलं नाही,  त्यामुळे अखेरीस सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला पूर्णवेळ नवा अध्यक्ष कधी मिळणार अशी चर्चाही सुरु झाली आहे. येत्या काळात देशात झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांनंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post