पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सोनेवाडी, जांब, सारोळा कासारने मारली बाजी


माय नगर वेब टीम

अहमदनगर - पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यावर्षी नगर तालुक्यातील सोनेवाडी, जांब व सारोळा कासार या गावांनी बाजी मारली. सोनेवाडीला तालुक्यात प्रथम (१० लाख रुपये), जांब द्वितीय (६ लाख रुपये) तर सारोळा कासारला तृतीय (४ लाख रुपये) क्रमांकाचे बक्षीस मिळाले.


पुणे येथील बालेवाडीत रविवारी (दि.११) पार पडलेल्या वॉटर कप पुरस्कार वितरण सोहळ्यात जलसंधारणात भरीव काम करणाऱ्या गावांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी अभिनेते आणि पाणी फौंडशनचे संस्थापक अमीर खान, किरण राव, पोपटराव पवार, अनेक सिनेअभिनेते, उच्चपदस्थ अधिकारी, पाणी फौंडशनची सर्व टीम व राज्य भरातील स्पर्धेत सहभागी गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वर्षी दि.८ एप्रिल ते २७ मे अशी ५० दिवस ही स्पर्धा पार पडली. नगर तालुक्यात स्पर्धेसाठी ५२ गावांनी प्रशिक्षण घेतले होते. यातील अवघ्या १० ते १२ गावांनी तालुक्यात काम करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच स्पर्धेचे पारितोषिक मिळविण्यासाठी अत्यंत चुरस निर्माण झाली होती. यामध्ये आज पुणे येथे पाणी फौंडेशन ने आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात तालुक्यात बाजी मारणाऱ्या गावांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सोनेवाडी (चास) गावाने प्रथम क्रमांक मिळविला. या गावाला पाणी फौंडशन कडून १० लाखांचे बक्षीस मिळाले. तालुक्यात द्वितीय क्रमांक जांब या गावाने तर तृतीय क्रमांक सारोळा कासार या गावाने मिळविला. जांब गावाला ६ लाख रुपये, सारोळा कासार गावास ४ लाख रुपये शासनाच्या वतीने दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

नगर तालुक्यात विविध गावात श्रमदान चळवळ अधिक जोमाने वाढण्यासाठी विविध गावाबरोबर तालुक्यातील अधिकारी, विविध सामाजीक संघटना यांनी विशेष परिश्रम घेतले होते. पाणी फौंडशनचे जिल्हा समन्वयक विक्रम फाटक, तालुका समन्वयक दिलीप कातोरे, सुधीर मांडगे यांनी स्पर्धा काळात सर्व सहभागी गावांना रात्रंदिवस मार्गदर्शन केले होते. सलग ५० दिवस तालुक्यात या सर्वांनी श्रमदान करून विशेष योगदान दिले होते. या सर्वाच्या मेहनतीचे हे फलित असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. पारितोषिकांची घोषणा होताच गावकऱ्यांनी एकच जल्लोष करत दुष्काळ मुक्तीच्या घोषणा दिल्या.

सलग दुसऱ्या वर्षी भाग घेणारे सारोळा कासार एकमेव मोठे गाव
या वॉटर कप स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सहभाग घेवून बक्षीसापर्यंत पोहचणारे सारोळा कासार हे एकमेव मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. तालुक्यात ४ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांपैकी सारोळा वगळता एकही गाव गेल्या दोन्ही वर्षात बक्षीसापर्यंत पोहचले नव्हते. मोठ्या गावांना श्रमदानासह मशीन कामाचे उद्दिष्टही जास्त असते. पण तरीही या मोठ्या आव्हानाला न डगमगता आमचे प्रशिक्षण घेतलेले जलमित्र आणि ग्रामस्थांनी ५० दिवस केलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया सारोळा कासारचे उपसरपंच व पाणी फौंडेशनचे वॉटर हिरो जयप्रकाश पाटील यांनी व्यक्त केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post