माय नगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा परिषदेचे सीईओ विश्वजीत माने यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी सोमवारी (८ जुलै) दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेत विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत माने यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यात येणार आहे. सभेचा अजेंडाही सदस्यांना पाठवण्यात आला आहे. सीईओ माने यांना याआधीच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
या सभेत सीईओ माने यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी आधीच स्पष्ट केले होते. जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही यास पाठिंबा दिला होता. त्यानंतर सभेचा अजेंडा तयार करण्यात येऊन सदस्यांना पाठवण्यात आला. यामध्ये सीईओंना अधिकार पदावरून परत बोलावण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या सभेत अविश्वास ठराव आणला जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या सभेत हा ठराव मंजूर होणार किंवा नाही, याबाबत मात्र उत्सुकता वाढली आहे. या सभेत किती सदस्य उपस्थित राहतात, किती सदस्य ठरावाच्या बाजूने मतदान करतात तसेच सदस्य गैरहजर राहतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सभेत ठराव मंजूर झाला तर हा ठराव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर या ठरावावर मुख्यमंत्री निर्णय घेतील.
अविश्वास ठरावाच्या निमित्ताने राजकीय घडामोडी देखील घडणार आहेत. या ठरावाच्या मुद्द्यावरून राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे. पालकमंत्री राम शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात सुप्त संघर्षाची चिन्हे आहेत. या ठरावाच्या कृतीबद्दल पालकमंत्री शिंदे यांनी आधीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील भाजपचे सदस्यही गोंधळात पडले आहेत. याआधीच्या सभेत अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांनी टीका केली. तसेच सीईओंवरील अविश्वास ठरावासही पाठिंबा दिला. परंतु, आता मात्र त्यांच्यासमोर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत पालकमंत्री त्यांना काय आदेश देतात याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे जवळपास ९ सदस्य आहेत. यावेळी या सदस्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
Post a Comment