उत्तर प्रदेश:
यमुना एक्स्प्रेस वेवर प्रवासी बस नाल्यात कोसळून २९ जण ठार झाले असून १६ प्रवासी गंभीर जखमी आहेत. लखनऊहून दिल्लीला जात असलेल्या बसचा सोमवारी मध्यरात्री आग्राजवळ अपघात झाला. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास सुमारे पन्नास प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस नाल्यात कोसळली. बस चालकाचा डोळा लागल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २७ मृतदेह मिळाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस लखनौ येथून दिल्लीच्या दिशेने जात होती. मात्र, ती यमुना एक्स्प्रेस वे दरम्यान झरना नाल्यात ५० फूट खोलवर कोसळली. या बसमधून सुमारे ५० लोक प्रवास करत होते. यातील २९ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना एत्मादपूर पोलिस ठाणे हद्दीत घडली.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, चालकाला डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त बस अवध डेपोची होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तर उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ. पी. सिंह यांनी बचावकार्यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याची सूचना त्यांनी केली आहे.
सहा पदरी असलेला यमुना एक्स्प्रेस वे १६५ किलोमीटर लांब आहे. हा एक्स्प्रेस वे ग्रेटर नोएडाला आग्र्याशी जोडतो. या मार्ग २०१२ मध्ये बनविला होता.
Post a Comment