मराठा क्रांती मोर्चा : माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जामीन फेटाळला


माय नगर वेब टीम
राजगुरूनगर – खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 19) फेटाळला असल्याने मोहितेंच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दिलीप मोहिते यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी (दि. 18) राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांच्या न्यायालयासमोर मोहिते यांच्या बाजूने त्यांचे वकील ऍड. हर्षद निंबाळकर यांनी तर सरकारी पक्षाकडून ऍड. अरूण ढमाले यांनी युक्तिवाद केला. दोघांचेही म्हणणे न्यायाधीश अंबळकर यांनी ऐकून घेत शुक्रवारी (दि. 19) निर्णय देण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार अंबळकर यांनी आज निर्णय देत मोहिते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

चाकण येथे मोहिते यांचे भाषण झाले होते. त्यानंतर ते पुण्याला बॅंकेच्या बैठकीसाठी निघून गेले. त्यांच्या भाषणात त्यांनी नागरिकांना भडकविले तर नाहीच, उलट शांततेचे आवाहन केले होते. पोलिसांनीच दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मोहितेंबाबत काहीही उल्लेख नाही. त्यानंतर 83 आरोपी अटक केले त्यांच्या जबाबामध्ये मोहितेंचा उल्लेख नाही. अचानक एक वर्षांनंतर मोहिते आरोपी असल्याचा पोलिसांना साक्षात्कार झाला आणि त्यांच्यावर कटकारस्थान केल्याचे कलम वाढवून मोहितेंना आरोपी करण्यात आले आहे, असा युक्तिवाद दिलीप मोहिते पाटील यांच्या बाजूने त्यांच्या वकिलांनी केले होते.

तर चाकणच्या हिंसाचाराच्या घटनेआधी काही दिवस हे कटकारस्थान करण्यासाठी, एक गुप्त बैठक झाली. तिथे मोहिते होते. तसे काही साक्षीदारांचे जबाब आहेत, पण त्यांची नावे आता उघड करता येणार नाहीत. त्या जबाबांवरून आणि मोहिते यांच्या भाषणातील वक्तव्यावरून त्यांना या घटनेची पूर्वकल्पना होती, हे स्पष्ट होत आहे, म्हणून त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकील अरूण ढमाले यांनी केला. त्यामुळे त्यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post