
माय नगर वेब टीम
बेळगाव - गोकाकचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जारकीहोळी यांनी राजीनामा पत्र सभापतीकडे पाठवले असल्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. बळारीचे आमदार आनंदसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकात भाजपचे ऑपरेशन कमळ यशस्वी होणार काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मंत्रिपद गेल्यापासून रमेश जारकीहोळी नाराज आहेत. अनेकवेळा त्यांनी आपली नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली असून आता त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे. रमेश जारकीहोळी सध्या मुंबईत असून तिथूनच त्यांनी फॅक्सद्वारे राजीनामा पाठवला आहे. मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते परतणार असल्याची माहिती आहे.
गृहमंत्री एम.बी.पाटील सोमवारी बेळगावात होते. त्यांनी जारकीहोळी यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला नाही. आनंदसिंग यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. राजीनामा सभापतींच्याकडे दिल्यावर त्यानंतर त्याबाबत कार्यवाही होते. रमेश जारकीहोळी माझे चांगले स्नेही आहेत. मी त्यांच्याशी माहिती घेऊन बोलतो, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, राज्यातील युती सरकारला धोका नाही. आणखी चार वर्षे सरकार पूर्ण करेल. भाजपला पंधरा आमदार पाहिजे आहेत. भाजप पंधरा आमदार कोठून आणणार? असा सवालही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
कर्नाटक विधानसभेत सध्याची स्थिती
कॉंग्रेस आघाडी
काँग्रेस : 78
जेडीएस : 37
बीएसपी : 1
अपक्ष : 2
एकूण: 118
भाजप : 105
Post a Comment