'साकळाई’मार्गी लावा अन्यथा विधानसभेला मतदानावर बहिष्कार टाकणार


अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या जनजागृती दौऱ्यात गावागावातील ग्रामस्थांचा इशारा

माय नगर वेब टीम

अहमदनगर - नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांसाठी ठरणार्‍या 'साकळाई’ उपसा जल सिंचन योजनेसाठी अभिनेत्री दिपाली सय्यद - भोसले यांच्या जनआंदोलनाची सरकारने तातडीने दखल न घेतल्यास प्रसंगी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू, एकही मतदान यंत्र अथवा मतदान कर्मचाऱ्याला गावात येवू देणार नाही असा इशारा या योजनेच्या लाभार्थी गावातील ग्रामस्थांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या जनजागृती दौऱ्यात दिला आहे.

'साकळाई’ योजनेसाठी क्रांतीदिनी (दि.९ ऑगस्ट) जिल्हापरिषदेसमोर होणाऱ्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या उपोषणाला मोठ्या जनआंदोलनाचे स्वरूप येवून राज्य सरकारवर दबाव येण्यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद गावोगावी जनजागृती दौरा सुरु केलेला आहे. नगर तालुक्यातील गावांचा दौरा केल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण, वलघुड, कामठी, ढोरजा, पिसोरे खांड, कोळगाव आदी गावांत त्यांनी जनजागृती दौरा काढत सभा घेतल्या. या सभांमध्ये गावागावातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला, तरुण वर्गासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होत आंदोलनास पाठींबा देत आहेत. यावेळी 'साकळाई’ उपसा जल सिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे, बाळासाहेब नलगे, सतीश ढवळे, बाळासाहेब लंभाटे, नारायण रोडे, कृषिराज टकले, उद्योजक विमल पटेल, सोमनाथ धाडगे, गोवर्धन कराळे, सुभाष कांबळे, सुनिल शिंदे, आदिनाथ शिंदे, सचिन शिंदे, अनिल कळमकर, बाळासाहेब महाडिक, श्रीराम टकले, सुभाष नागरे, भाऊसाहेब शिंदे, दीपक टकले, प्रतिभाताई धस आदींसह कृती समितीचे सदस्य, विविध गावांमधील नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभिनेत्री दिपाली सय्यद - भोसले म्हणाल्या, 'साकळाई’ योजनेबाबत नुसत्या घोषणा ऐकून एक पिढी संपली आहे, मात्र आता राजकारण अजिबात होवू देणार नाही, ही योजना शासनाकडून मंजूर करून घ्यायची हीच वेळ आहे, आता नाही तर पुढे कोणीही या योजनेचे नाव सुद्धा घेणार नाही. त्याचा सर्वात मोठा फटका या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांनाच बसणार आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला तरी हक्काचे पाणी मिळावे म्हणून हा लढा असून यामध्ये लाभार्थी गावातील शेतकरी, ग्रामस्थ, युवक वर्ग, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post