किरण काळे उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींच्या दरबारी ; म्हणाले 'या' कारणांमुळे मीच नगरकरांसाठी सक्षम पर्याय




माय नगर वेब टीम
अहमदनगर : राष्ट्रवादीच्या वतीने नगर शहर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी उमेदवारीबाबत नुकतीच पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील तसेच खा.सुप्रिया सुळे यांच्या भेटी घेतल्या.


मागच्या आठवड्यात जिल्ह्याचे प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील, निरीक्षक अंकुश काकडे, मा.खासदार देवीदास पिंगळे आदींच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यावेळी किरण काळे यांनी शहरातून विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली होती.


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना स्वतःचा मतदारसंघ असून देखील स्वतःच्या मतदारसंघांमध्येच पिछाडी मिळाली होती.


पक्षाच्या मुंबईत झालेल्या लोकसभा आढावा बैठकीला आणि राष्ट्रवादी भवन येथे पार पडलेल्या मुलाखतीला देखील आमदार संग्राम जगताप यांनी दांडी मारली होती. त्यांच्या संभाव्य पक्ष बदलाची चर्चा जोरदार सुरू आहे.


किरण काळे मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. काळे हे खा. सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत.


काळे यांनी घेतलेल्या भेटीगाठींबद्दल बोलताना सांगितले की, नगर शहरातील राजकीय परिस्थितीचा आपण पक्षश्रेष्ठींसमोर आढावा मांडला आहे. सध्या पक्ष मोठ्या संकटाच्या काळातून जात आहे अशावेळी एक-एक जागा महत्त्वाची आहे.


नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहता शहरातील उमेदवार बदलला गेला नाही तर शहरामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मला पक्षाने संधी दिल्यास आपण ही जागा निश्चित पणे जिंकून दाखवू.


नगर शहरातील मतदार अत्यंत सुज्ञ असून शहरातील खुंटलेला विकास, दहशतीचे वातावरण, गुंडगिरीचे साम्राज्य, बेरोजगारी आदी प्रश्नांमुळे सर्व नेतृत्वाला जनता वैतागलेली आहे. मतदारांना स्वच्छ आणि सक्षम पर्याय हवा आहे आणि हा पर्याय देण्याची क्षमता आणि विकासाचे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व म्हणून मी निश्चितपणे निवडून येऊ शकेल.


त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळावी असा आग्रह काळे यांनी या भेटीं दरम्यान पक्षश्रेष्ठींकडे धरला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post