भाजपात मेगाभरती



माय नगर वेब टीम

मुंबई-

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे पक्ष सोडण्याचे सत्र सुरूच असून, मंगळवारी राष्ट्रवादीचे अकोले येथील आमदार वैभव पिचड, सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळा येथील आमदार कालिदास कोळंबकर यांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केले. या चार आमदारांसह राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. प्रवेश करणाºया नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी असणार आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाचा हा ‘मेगा शो’ ठरण्याची शक्यता आहे. आमदार वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक तसेच काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये येण्यासाठी तयार असलेल्या कोळंबकर यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. शिवेंद्रसिंहराजे साताºयातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.शिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ते पक्ष सोडणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. त्यासाठी शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे यांचा वाद मिटवण्याचाही प्रयत्न झाला. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बँकेचे संचालकही भाजपमध्ये जाणार आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपचे नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात आहेत. महाजन यांच्या शिवनेरी बंगल्यावर अनेक आमदार महाजन यांना भेटत आहेत. मंगळवारी शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड आणि कालिदास कोळंबकर यांनी राजीनामे देतानाही महाजन हे त्यांच्या सोबत होते. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील.




उल्हासनगरच्या राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह काही आमदार गिरीश महाजन यांना भेटले. भाजपचे सध्या १२२ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत युती झाल्यास केवळ १५ जागा भाजपकडे शिल्लक राहतील. मात्र पक्षात प्रवेश करणाऱ्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे या आमदारांना नक्की कोणती आश्वासने देण्यात आली आहेत, येत्या काळात निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपने नक्की कोणती रणनीती आखली आहे, याबाबत राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क सुरू आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post