महापालिकेच्या विकासासाठी 'ती' अट रद्द करा ; महापौर, उपमहापौरांसह भाजपाच्या नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
माय नगर वेब टीम
अहमदनगर - शहर विकासासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत सरकारने मंजूर केलेल्या १०० कोटी निधीतील महापालिका हिश्श्याची ३० कोटींची अट रद्द करून हे पैसेही सरकारनेच द्यावेत याशिवाय 'महापालिकेला पूर्णवेळ शहर अभियंता दिला जावा आणि विद्युत अभियंत्यांसह इतर अभियंत्यांच्या रिक्तपदांची भरती करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळेंसह उपमहापौर मालन ढोणे व भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात मंगळवारी (दि.३०) दुपारी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून निवेदन देत चर्चा केली. यावेळी नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज कोतकर, महेंद्र गंधे, राहुल कांबळे, संजय ढोणे, उदय कराळे, सतीश शिंदे,विलास ताठे, सूरज शेळके, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, शहर विकासासाठी सरकारने सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत १०० कोटीचा निधी मंजूर केला आहे. परंतु कामे प्रस्तावित करताना ७० टक्के निधी शासनाचा व ३० टक्के हिस्सा महापालिकेला टाकावा लागणार आहे. एवढी ३० कोटी रक्कम टाकण्याची परिस्थिती महापालिकेची नसल्याने ही कामे रखडण्याची शक्यता आहे.त्यामुळे महापालिका हिश्श्याची ३० कोटींची अट रद्द करून हे पैसेही सरकारनेच द्यावेत अशी मागणी करण्यात आली. याशिवाय'महापालिकेला पूर्णवेळ शहर अभियंता दिला जावा आणि विद्युत अभियंत्यांसह अभियंत्यांच्या रिक्तपदांची भरती करण्याच्या परवानगीची मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
Post a Comment