कोण कोणाच्या पक्षात आहे ते कळत नाही



माय नगर वेब टीम
मुंबई - भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. बुधवारी अनेक जण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, मात्र हल्ली कोण कोणत्या पक्षात आहेत, हेच कळत नाही, अशी खोपरखळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारली. हर्षवर्धन पाटील यांच्या ' विधान गाथा ' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांचा हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ही उपस्थित होते.

 मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले ?
हल्ली कोण कोणत्या पक्षात आहेत हेदेखील कळत नाही. आम्हालादेखील माहीत नसतं की, आमच्या पक्षात कोण येणार ते ? आम्हाला पेपरवाल्यांकडूनच दुसऱ्या दिवशी समजते, असे मुख्यमंत्री म्हणाले. एवढंच नाही, तर अलीकडच्या काळात कुणासोबत फोटो काढायला भीती वाटते, असेही ते म्हणाले. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या पुस्तक प्रकाशनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक दिगग्ज उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटलांची स्तुती -

मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या विधान गाथा या पुस्तकाचे कौतुक केले. विधीमंडळ कामकाजाची नीट ओळख होऊ शकते, असे पुस्तक हर्षवर्धन पाटील यांनी लिहिले, असे सांगत विधान मंडळ कामकाजाचे हॅण्ड बुक म्हणजे विधान गाथा हे पुस्तक असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या 'आऊटगोइंग'चा 'जाणत्या राजा'लाही धसका
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार 'आऊटगोइंग' सुरू असून याचा धसका खुद्द जाणता राजा म्हणजेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खुद्द शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तब्येत बरी नसताना हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. मात्र आपण या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहू शकणार की नाही, याची शंका नव्हती, पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मला या प्रकाशनाला हजर राहावे लागले, असे शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या समोर म्हणाले.

नेमके शरद पवार काय म्हणाले ?

या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला मला यायला जमेल की नाही अशी शंका होती. कारण काल रात्री माझ्या जिभेचे आणि गळ्याचे ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी सांगितले बोलू नका, पण सध्याचे महाराष्ट्राचे वातावरण पाहता, मी या कार्यक्रमाला गेलो नाही तर पत्रकार छापतील की, मी गिरीश महाजन यांच्यासोबत अमित शहा यांना भेटायला गेलो, असे सांगत शरद पवार यांनी आऊटगोइंगवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री खुल्या दिलाने हसतात - सुशीलकुमार शिंदे

भाजपामध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती झोप उडाली आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री असून, त्यांच्या जे मनात आहे ते करतात आणि खुल्या दिलाने हसतात, अशी खोपरखळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावली.

अशी ही टोलवाटोलवी -

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही कोपरखळी मारली. सध्या राजकीय घडामोडी वेगवेगळ्या घडू लागल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकाच्या दोन ते तीन आवृत्ती काढायला हरकत नाहीत, असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच कुठलाही संसदीय कार्यमंत्री हा मुख्यमंत्र्यांचा विश्वासू असतो अशी प्रथा आहे, पण आता काय प्रथा आहे हे काही माहीत नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विनोद तावडे यांना लगावला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post